पवारांवरील इडी कारवाईचा राष्ट्रवादीकडून नागपुरात विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:52 PM2019-09-25T20:52:48+5:302019-09-25T20:54:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला.
सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि निदर्शने करून चौक दणाणून सोडला. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्तही तगडा ठेवण्यात आला होता. मात्र निदर्शने व घोषणाबाजी करीत हे अर्धनग्न आंदोलन शांतपणे पार पडले.
प्रतिक्रिया देताना रायुका शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले, शरद पवार यांच्या दौऱ्याला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद सहन न झाल्याने निव्वळ भीतीपोटी त्यांच्याविरूद्ध इडीमार्फत खोटे गुन्हे नोंदविले आहेत. भाजपा निव्वळ द्वेषाचे राजकारण करीत आहे. त्याचाच हा एक अनुभव आहे.
नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर म्हणाले, शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादाला घाबरून भाजप सरकारने ही कारवाई केली. ज्या बँकेमध्ये ते कधी संचालकसुद्धा नव्हते, अशा बँक गैरव्यवहारप्रकरणी सूडबुद्धीने ईडीमार्फत खोटा गुन्हा दाखल केला.
आंदोलनामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, राकाँचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्यकारी अध्यक्ष जावेद हबीब, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नुतन रेवतकर, प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य, रायुकाँ शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, बजरंग परिहार, अनिल अहिरकर, नुतन रेवतकर, वर्षा शामकुळे, अविनाश गोतमारे, दीनानाथ पडोळे, दिनकर वानखडे, धनराज फुसे, श्रीकांत शिवनकर, अशोक काटले, देवीदास घोडे, विशाल खांडेकर, रुद्र धाकडे, रोशन भीमटे, नरेंद्र पुरी, वाजिद शेख, महेंद्र भांगे, फैजान मिर्जा, राकेश तिवारी, रिजवान अन्सारी, शोभा भगत, राणी डोंगरे, पुष्प डोंगरे, तौसीफ शेख, अमोल पालपल्लीवार, सौरभ मिश्रा, अमित पिछकाते, अजहर पटेल, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, प्रणय जांबुळकर, कमलेश बांगडे, तनवीर खान, नफिल अन्सारी, मनीषा साहू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज सहाही विधानसभा क्षेत्रात आंदोलन
शरद पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ नागपूर ग्रामीण क्षेत्रातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये गुरुवारी आंदोलन करून निवेदन देण्यार असल्याचा निर्णय सायंकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण फ्रंटल जिल्हा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत पक्षकार्यालयात ही बैठक झाली. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी केले आहे.