जीवतोडेंच्या रूपात राष्ट्रवादीने खेळले ओबीसी कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:53+5:302021-07-15T04:06:53+5:30
नागपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, ओबीसींचे दिग्गज नेते डाॅ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. ...
नागपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, ओबीसींचे दिग्गज नेते डाॅ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. हा प्रवेश घडवून राष्ट्रवादीने ओबीसी कार्ड खेळत पूर्व विदर्भातील ओबीसी समाजात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ओबीसी नेते म्हणून इमेज असलेले नाना पटोेले यांना त्यांच्याच पट्ट्यात एक पर्याय उभा करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
अशोक जीवतोडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक आहेत. तर ते धनोजे कुणबी समाजातून येतात. चंद्रपूर जिल्ह्यात या समाजाची गठ्ठा व्होट बँक असून ती निर्णायक ठरत आली आहे. राज्यभर ओबीसी आंदोलनाने जोर धरला आहे. सर्वच पक्ष ओबीसींना आपलेसे करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओबीसी नेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे पूर्व विदर्भात तगडा ओबीसी चेहरा नाही. त्यामुळे ओबीसी समाज स्वत:कडे वळविणे राष्ट्रवादीला तसे कठीण होते. अशात राष्ट्रवादीने ओबीसी चळवळीतील आघाडीच्या नेतृत्वाला सोबत घेत पूर्व विदर्भात विस्कटलेली पक्षाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिन्यात नाना पटोले यांनी जीवतोडे यांची भेट घेत ऑफर प्रवेशाची दिली होती. पण जीवतोडे यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली.
अशोक जीवतोडे मूळचे काँग्रेसी आहेत. त्यांचे वडील श्रीहरी जीवतोडे हे १९६४ मध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा ते राष्ट्रवादीसोबत होते. सक्रिय राजकारणात नव्हते. धाकटे बंधू संजय जीवतोडे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक होती. मागील १० वर्षात अशोक जीवतोडे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती. जीवतोडे विविध निवडणुकांमध्ये भाजपला मदत करतानाही दिसले. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपलाही धक्का बसला आहे.
ओबीसी चळवळीत कार्यकर्त्यांना मात्र चिंता
- जीवतोडे हे गेल्या काही वर्षांपासून ओबीसी चळवळीत सक्रिय आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक म्हणून काम करीत आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पक्ष दबावाखाली येऊन चळवळीचे नुकसान होऊ नये, अशी चिंता चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.