आगामी निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत
By कमलेश वानखेडे | Published: July 15, 2022 05:16 PM2022-07-15T17:16:37+5:302022-07-15T17:53:39+5:30
राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.
कमलेश वानखेडे
नागपूर : नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे.
हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण याबाबत काँग्रेस सोबत व शिवसेने सोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरधरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे. हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का, असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर
राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. नव्या सरकारने काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले, असे सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, राऊत हे या दोघांबरोबर काम करून आहेत, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे. ५० पैकी एकही आमदार हरला तर राजीनामा देईन या शिंदे यांच्या वक्तव्यावर आपल्याला आता काहीही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.
सत्तेचा गैरवापर टीकत नाही, श्रीलंकेने दाखवून दिले
- श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली होती. सत्तेचा पाहिजे तसा वापर केला जात होता. आज लोक राष्ट्रपतींच्या घरात घुसुन संघर्ष करीत आहेत. लाखो लोक रस्त्यावर आहेत. सत्तेचा गैरवापर हा फार काळ टीकत नसतो, हे श्रीलंकेने दाखवून दिले आहे, असे सांगत पवार यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना एकसंघ राहून शक्तिशाली संघटन उभारण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या बैठकीत केले.