आघाडीच्या बळावर राष्ट्रवादी नागपुरात कसतेय कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:18 PM2019-08-22T19:18:40+5:302019-08-22T19:20:30+5:30
काँग्रेससोबत युती कायम ठेवायची आणि जे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत त्यांनाच तिकिटांमध्ये प्राधान्य द्यायचे, असे यवतमाळात अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेतील तिकिटेच्छुक आता आपापली विजयाची ताकद तपासायला लागले आहेत.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूय नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. विदर्भातून दोन दिवसांपूर्वीच ही यात्रा मराठवाड्यात प्रवेशली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेमध्ये ज्यांचे असणे अपेक्षित होते, ते (साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले) सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिसत असल्याने एकप्रकारची अस्वस्थता नेत्यांमध्येच जाणवत आहे. सोलापुरातील करमाळाच्या नेत्या रश्मी बागल यांनीही बुधवारी अचानकपणे मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. पश्चिम विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम आधार समजले जाणारे मनोहरराव नाईक यांनी गेल्या आठवड्यातच पक्ष सोडण्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. सध्यातरी पुसदच्या बंगल्यावर शांतता दिसत आहे. बुधवारी पुसदला पोहचलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेदरम्यान मनोहरराव नाईक पुन्हा अजित पवारांच्या बाजूने व्यासपीठावर दिसले, त्यामुळे भांबावलेले कार्यकर्तेही सध्या शांत झाल्यागत दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा विदर्भातून पुढच्या प्रवासाला निघाली आहे. काँग्रेससोबत युती कायम ठेवायची आणि जे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत त्यांनाच तिकिटांमध्ये प्राधान्य द्यायचे, असे यवतमाळात अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेतील तिकिटेच्छुक आता आपापली विजयाची ताकद तपासायला लागले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघावर नजर टाकली तर, एकमेव सावनेर ही काँग्रेसच्या ताब्यात आलेली जागा वगळता उर्वारित सर्व ११ जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. नागपूर शहराचा विचार करता नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य या सहाही ठिकाणी भाजपाचेच आमदार आहेत. गेल्या पाच वर्षांत या सर्वच ठिकाणी भाजपाने आपली पकड पुन्हा मजबूत कशी होईल, याचाच प्रयत्न चालविला आहे.
१५१ नगरसेवक असलेल्या नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीकडे फक्त एक नगरसेवक आहे. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. अशापरिस्थितीत येती विधानसभानिवडणूक राष्ट्रवादीला पेलायची आहे. निवडणुका आल्यावर सर्वच कामी लागतात.राष्ट्रवादीनेही तयारी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नागपूर महानगर (जिल्हा) अध्यक्ष अनिल अहिरकर यांना विचारले असता १५ दिवसांपूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. आमचे आघाडीचे ठरले आहे. जागावाटपाचेही पक्के झाले आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरातील जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. गेल्या दोन-तीन टर्मपासून पश्चिम नागपुरातील काँग्रेसच्या उमेदवाराचा सतत पराभव होत असल्याने ही जागाही या वेळी राष्ट्रवादीकडे द्यावी, असा सूर आळवला जात आहे. यावर काय निर्णय व्हायचा, तो आघाडीच्या बैठकीत होणारच आहे.
२०१५ आणि २००९ च्या निवडणुकीत हिंगणा आणि काटोल या दोन जागा आघाडीच्या धर्मानुसार काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडल्या होत्या. या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादीची चांगली पकड होती. त्याचा परिणाम यापूर्वीच्या निवडणुकीतही उमटला होता. २०१४ च्या निवडणुकीत मात्र आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने सर्वच जागांवार उमेदवार उभे केले होते. मात्र हिंगणा आणि काटोल या दोन खात्रीच्या ठिकाणी या पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर गेले. इतर मतदार संघामध्येही बरीच पीछेहाट झाली. त्यामुळेच की काय या वेळी मात्र आघाडीने निवडणुका लढविण्यावर सर्वांचेच एकमत दिसत आहे. सध्यातरी राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी तयारी चालविली आहे. एवढेच नाही तर महानगरातील जागाही वाढवून मागतिल्या आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर जे चित्र यायचे ते येईलच, सध्यातरी घड्याळाची टिकटिक सुरू आहे.