राष्ट्रवादीसाठी विदर्भात सोळावं वरीस धोक्याचं!
By admin | Published: September 24, 2015 03:25 AM2015-09-24T03:25:36+5:302015-09-24T03:25:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला गेल्या जूनमध्ये १६ वर्षे पूर्ण झाली. १६ वे वर्ष विदर्भात राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने धोक्याचं ठरलं.
पवार आखताहेत रणनीती : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न
कमलेश वानखेडे नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला गेल्या जूनमध्ये १६ वर्षे पूर्ण झाली. १६ वे वर्ष विदर्भात राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने धोक्याचं ठरलं. एकेकाळी ११ आमदार देणारा पक्ष एका आमदारावर आला. आता १७ व्या वर्षांत सावधगिरीने पावलं टाकली जात आहेत. एवढा काळ जाऊनही विदर्भात राष्ट्रवादी पाहिजे तशी मुरलेली नाही. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात. पण विदर्भात राष्ट्रवादी थेंब थेंब गळत राहिली. मुरब्बी राजकारणी असलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, ते स्वत: रणनीती आखत आहेत. पवारांचा विदर्भ दौरा राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्याचा एक भाग मानला जात आहे.
राष्ट्रवादीत सर्वच बाबतीत संपन्न असलेले मोठमोठे नेते आहेत. मात्र, त्यानंतरही विदर्भातील मतदार दुरूनच ‘घडी’ बघतो आहे. राष्ट्रवादीत नेते खूप आहेत, पण कार्यकर्ते नाहीत. विदर्भात राष्ट्रवादीची शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ज्या सहकार क्षेत्राच्या बळावर राष्ट्रवादीला भक्कम पाठबळ मिळाले, त्या सहकार क्षेत्रातही राष्ट्रवादीची पकड ढिली होत चालली आहे. पवारांनी एकेकाळी विदर्भात ज्यांना ताकद दिली, त्या नेत्यांनी नंतर राष्ट्रवादीची साथ सोडली. ज्यांना मंत्रिपदे दिली त्यांनी आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकही जागा वाढवून दाखविली नाही. त्यामुळे पक्ष आहे तेथेच राहिला. त्यामुळे एकदाचे ‘परफॉर्मन्स आॅडिट’ होणे आवश्ययक आहे.
एकेकाळी साहेब, दादांच्या आकर्षणाने विदर्भातही राष्ट्रवादीत बाहेरच्यांनी गर्दी केली होती. मात्र, लोकसभा, विधानसभेच्या निकालानंतर ‘इनकमिंग’ बंदच झाले आहे; सारखे ‘आऊट गोर्इंग’ सुरू आहे. दुसऱ्या फळीतील सक्रिय व सक्षम नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा मार्ग धरला आहे. त्यांची ‘घरवापसी’ कशी करता येईल, यावर विचार करावा लागेल. सोबतच ‘घर का भेदी’ हेरून त्याला बाहेरचा रस्ताही दाखवावा लागेल. चांगले लोक बाहेर व बाहेरच्यांशी जवळीक असलेले लोक पक्षात राहिले तर पवारांनी वर्षभर दरमहा विदर्भाच्या वाऱ्या केल्या तरी पक्ष वाढणार नाही.
हा पक्ष कंत्राटदारांचा पक्ष असल्याचीही टीका होत असते. यातून पक्षाची बदनामी होते व सामान्य कार्यकर्ता पक्षापासून दूर राहणेच पसंत करतो. ही इमेज बदलण्यासाठी तशी पावले उचलावी लागतील.
नागपुरात पवारांनी एक नवा प्रयोग केला. माजी मंत्र्यांकडे शहर व जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविली. संघर्षाच्या काळात असे निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे असून, असेच प्रयोग इतर ठिकाणीही होणे आवश्यक आहे. लोकसभा व विधानसभेच्या पराभवानंतर भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने घेतलेली मुसंडी पक्षासाठी आशादायी चित्र निर्माण करणारे आहे.
इतर जिल्ह्यातही महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुका राजकारणाचा पाया मानला जातो. कदाचित म्हणूनच पुढे सत्तेची इमारत उभारण्यासाठी पवार कामाला लागले आहेत.