भेसळीच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By admin | Published: November 1, 2015 03:19 AM2015-11-01T03:19:42+5:302015-11-01T03:19:42+5:30
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत शहरात मिठाई व इतर गोड पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे.
अन्न व औषध विभागाच्या सहआयुक्तांना घेराव : सणासुदीच्या काळात पदार्थातील भेसळ रोखावी
नागपूर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत शहरात मिठाई व इतर गोड पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे. भेसळयुक्त खवा व दूधाचे साठे वाढले आहेत. या भेसळीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांना घेराव घोलण्यात आला. यावेळी त्यांना शहरात विविध पदार्थांमध्ये सुरू असलेल्या भेसळीबाबत अवगत करून सणासुदीच्या काळात हा प्रकार प्रकर्षाने रोखण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजय पाटील व शहर महासचिव राजेश कुंभलकर यांच्या नेतृत्वात हा घेराव घालण्यात आला. मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातूनही शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पदार्थ येत आहेत, याकडे लक्ष वेधत ते रोखण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औषध फार्मसींची तपासणी करण्यात यावी, विना परवानाधारक हॉटेल व दुकानांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
याप्रसंगी देसाई यांनी तपासणी व कारवाई करण्याचे काम सुरूअसल्याचे सांगत सणासुदीनिमित्त कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नगरसेवक कामिल अन्सारी, नगरसेविका प्रगती पाटील, कल्पना मानकर, नंदा चौधरी, हरविंदरसिंग मुल्ला, रवी गाडगे, मुन्ना तिवारी, सुनील राऊत, तनुज चौबे, प्रतिभा वासनिक, धनंजय देशमुख, चेतन राजकारणे, कादीर शेख, पराग नागपुरे, योगेश मसराम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)
मेडिकलची रक्तपेढी सुरू करा
याप्रसंगी मेडिकलच्या रक्तपेढीबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मेडिकलची रक्तपेढी ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी लाभदायक आहे. रक्तपेढीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे निर्देश द्या, परंतु रक्तपेढी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.