रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला

By नरेश डोंगरे | Published: December 11, 2023 08:42 PM2023-12-11T20:42:59+5:302023-12-11T20:42:59+5:30

कार्यक्रमाला काही तासांचा अवधी, अन् ...

NCP's BP increased due to Rohit Pawar's hyper acidity | रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला

रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला

नागपूर : सुमारे आठशे किलोमिटरच्या परिघातील गावांमध्ये फिरून मरगळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्साहाचा डोज देत नागपुरात पोहचलेल्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप होत आहे. मात्र, यात्रा समारोपाच्या पूर्वसंध्येलाच या यात्रेचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार हे हायपर ॲसिडिटीने त्रस्त झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बीपी वाढल्यासारखा झाला आहे.

राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर पक्षात मरगळ आल्यासारखी झाली. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना, खास करून युवा कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याच्या उद्देशाने रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली. २४ ऑक्टोबरपासून यात्रेला सुरुवात झाली. चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, जरांगे पाटील यांचे उपोषण आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात पेटलेल्या मराठा आंदोलनामुळे रोहित पवारांनी काही दिवसांसाठी युवा संघर्ष यात्रा स्थगित केली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा ही यात्रा सुरू झाली. राज्यातील सुमारे ८०० किलोमिटरच्या परिघातील गावांतील राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांना उत्साहाचा डोज देत युवा संघर्ष यात्रा रविवारी रात्री नागपूर जिल्ह्यात पोहचली.

नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वातावरणात पक्ष प्रमूख शरद पवार यांचा वाढदिवस मंगळवारी १२ डिसेंबरला असून, याच दिवशी संघर्ष यात्रेचाही समारोप नागपुरात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची मंडळी उत्साहात आहे.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १ वाजता रोहित पवार पत्रकारांशी नागपुरात चर्चा करणार होते.

मात्र, त्यांना सकाळपासून ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगून पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी दुपारी १ ऐवजी पत्रकारांशी चर्चेची वेळ सायंकाळी ४.३० वाजताची ठरवली. परंतू त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे युवा संघर्ष यात्रा समारोपाच्या पूर्वसंध्येला होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. या संबंधाने पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्याकडे संपर्क केला असता डॉक्टरांनी रोहित पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ही पत्रकार परिषद स्थगित करण्यात येत असल्याचे पेठे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

कार्यक्रमाला काही तासांचा अवधी, अन् ...

पक्षातील अन्य काही स्थानिक नेत्यांकडे रोहित पवार यांच्या प्रकृती संबंधाने विचारणा केली असता अनेकांनी त्यावर बोलण्याचे टाळले. ते जवाहर विद्यार्थी वसतिगृहात आराम करीत असल्याची माहिती या मंडळींनी दिली. दरम्यान, पक्ष प्रमुखांचा वाढदिवस आणि यात्रा समारोपाच्या कार्यक्रमाला काही तासांचा अवधी उरला असताना रोहित पवारांची ॲसिडीटी वाढल्याने उभ्या राष्ट्रवादीचाच बीपी वाढल्यासारखा झाल्याचे जाणवत आहे.

Web Title: NCP's BP increased due to Rohit Pawar's hyper acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.