नागपुरात राष्ट्रवादीच्या भोंग्यातून महागाईविरोधात गजर; भाजप नेत्यांना त्यांच्याच भाषणाची करून दिली आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 12:04 PM2022-04-29T12:04:45+5:302022-04-29T12:09:09+5:30
भोंग्याचे राजकारण जोरात सुरू असताना नागपुरात राष्ट्रवादीनेही त्यात उडी घेतली. महागाईविरोधात भोंगा आंदोलन करत तब्बल १० मोठे भोंगे लावले.
नागपूर : भोंग्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी सकाळी शंकरनगर चौकात दहा भोंगे लावून महागाईविरोधात आंदोलन केले. सत्तेत नसताना भाजप नेत्यांनी महागाईविरोधात दिलेली भाषणे या भोंग्यांवरून जनतेला ऐकविण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार यांच्या नेतृत्त्वात हे अभिनव आंदोलन झाले. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा, महागाई कमी करा, अशी नारेबाजी या भोंग्यांतून करण्यात आली. वस्तूंचे भाव कमी झाले का, महागाई कमी झाली का, असे प्रश्न जनतेला विचारण्यात आले. येता - जाता लोक थांबून या आंदोलनाकडे कुतुहलाने पाहात होते.
यावेळी दुनेश्वर पेठे यांनी बेरोजगारी वाढली असल्याचे सांगत युवकांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांची डोकी भडकविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला, तर प्रशांत पवार यांनी भोंग्याचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत या भोंग्यांमार्फत महागाईचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.