जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या अधिकारांना राष्ट्रवादीची कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 11:53 AM2022-08-06T11:53:43+5:302022-08-06T11:58:30+5:30
कार्याध्यक्ष राजू राऊत यांच्यावर तीन विधानसभेची जबाबदारी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या विरोधात पक्षांतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीची अखेर पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या गुजर यांच्या अधिकारांना कात्री लावत त्यांच्याकडे तीनच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे, तर कार्याध्यक्ष राजू राऊत यांच्याकडे तीन विधानसभांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजू राऊत हे माजी मंत्री रमेश बंग यांचे निकटवर्तीय आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत यांना पाठबळ देण्यासाठी बंग हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नरत होते. त्यासाठी प्रदेशच्या नेत्यांकडे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. शेवटी पक्षाकडून दि. २५ जुलै रोजी एक पत्र जारी करीत गुजर व राऊत यांना तीन-तीन विधानसभा विभागून देण्यात आल्या. त्यानुसार गुजर यांच्याकडे काटोल, कामठी, रामटेक तर राऊत यांच्याकडे सावनेर, हिंगणा व उमरेड हे मतदारसंघ सोपविण्यात आले होते. मात्र, मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर सावनेर मतदारसंघातील पदाधिकारी सक्रीय झाले. गुजर यांच्याकडे सावनेर मतदारसंघ सोपवावा, अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे लावून धरली. या मागणीची दखल घेण्यात आली. दि. ५ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एक पत्र जारी करीत गुजर यांच्याकडे सावनेर, तर राऊत यांच्याकडे काटोल मतदारसंघ सोपविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
राऊत यांच्यावरही बंधन
- राऊत यांच्याकडे हिंगणा, उमरेड व काटोल हे मतदारसंघ सोपविण्यात आले असले तरी त्यांना या मतदारसंघात कोणतीही नियुक्ती करताना किंवा संघटनात्मक बदल करताना बाबा गुजर यांना विश्वासात घ्यावे लागेल. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष या दोघांच्याही स्वाक्षरीनेच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बंधन टाकण्यात आले आहे. विधानसभानिहाय नियुक्त्याही जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष या दोघांच्या स्वाक्षरीनेच कराव्या लागतील.