एनडीडीबीचे विदर्भ मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलनाचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:49 AM2018-04-21T01:49:35+5:302018-04-21T01:49:45+5:30
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डातर्फे (एनडीडीबी) विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती एनडीडीबीचे चेअरमन डॉ. दिलीप रथ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डातर्फे (एनडीडीबी) विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती एनडीडीबीचे चेअरमन डॉ. दिलीप रथ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
कविवर्य सुरेश भट सभागृहात शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी जुळलेल्या मुद्दांवर २१ एप्रिलला सकाळी १० वाजता आयोजित प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले आहेत. या कार्र्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
रथ म्हणाले, आजच्या तारखेपर्यंत एनडीडीबीचा सहायक उपक्रम मदर डेअरीने विदर्भाच्या अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात तसेच मराठवाड्याच्या नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून दोन लाख लिटर दूध संकलनाला सुरूवात केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून दररोज ४९ हजार लिटर दूध संकलित करण्यात येते. १४०० गावातील २७ हजार शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन होते. भविष्यात मदर डेअरीचे ७९ तहसीलांमधून दूध संकलनाचे नियोजन आहे. सध्या ५९ तहसीलातून दूधाचे संकलन होते. या व्यापक अभियानाचा परिणाम असा झाला की, मदर डेअरी स्थानिक शेतकऱ्यांना दर महिन्याला २० कोटींची उपजीविका प्रदान करण्यात यशस्वी ठरली आहे. या अभियानाने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील डेअरी शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नाला सोडविले आहे. त्यांना नियमित मिळकत व्हावी, असा या मागील हेतू आहे.
पत्रपरिषदेत एनडीडीबीचे कार्यकारी संचालक वाय.वाय. पाटील, महाव्यवस्थापक चेतन शर्मा. क्षेत्रीय प्रमुख (पश्चिम क्षेत्र) अनिल हातेकर उपस्थित होते.