भविष्यातील आपत्तींसाठी एनडीआरएफ होतोय सज्ज : महासंचालक एस.एन. प्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:44 PM2019-04-25T22:44:06+5:302019-04-25T22:45:25+5:30
देशातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासोबतच भविष्यातील इतर आपत्तींसोबतही दोन हात करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अत्याधुिनक प्रशिक्षण व यंत्रणांनी सज्ज होण्याची तयारी करीत आहे. यासाठी फोर्सला अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. यात माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासोबतच भविष्यातील इतर आपत्तींसोबतही दोन हात करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अत्याधुिनक प्रशिक्षण व यंत्रणांनी सज्ज होण्याची तयारी करीत आहे. यासाठी फोर्सला अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. यात माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
महासंचालक प्रधान हे नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रधान यांनी सांगितले की, भविष्यातील आपत्ती ही केवळ नैसर्गिक राहणार नसून ती मानवाद्वारे जैविक आणि रासायनिक हल्ल्याद्वारेही निर्माण केली जाऊ शकते. याचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सज्ज राहणे आवश्यक आहे. अलीकडे जंगलांमध्ये आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याच्या संरक्षणाचीही तयारी एनडीआरएफ करीत आहे. एनडीआरएफच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी इस्त्रो आणि डीआरडीओचे सहकार्य घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर सीआयएसआरसोबतही एमओयू करण्यात आलेला आहे.
पत्रपरिषदेला एनडीआरएफचे आयजी रवि जोसेफ लोक्कु, डीआयजी (ट्रेनिंग) मनोज कुमार यादव, डीआयजी (कार्य) के.के.सिंह, नागपूरचे कमांडेंट मनीष रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.
डेटा बेस व मॅपिंगवर भर
आपत्तीचा सामना करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यासाठी डेटाबेस व मॅपिंगवर भर दिला जात आहे. देशात मागील १० वर्षात आलेल्या नैसर्गिक व इतर आपत्तींचा डेटा एकत्र केला जात आहे. याचा अभ्यास करून एनडीआरएफ जवानांना प्रशिक्षण देणार आहे. यासाठी दिल्ली येथे डिझास्टर कंट्रोल रुम तयार करण्यात येणार आहे. ते एनडीआरएफचे इंटिग्रेटेड आॅपरेशनल सेंटर राहील. जेथून प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य ती मदत पोहोचवण्यात येईल. यासोबतच डिझास्टरचे स्वतंत्र कम्युनिकेशन सिस्टीमसुद्धा तयार करण्यात येणार आहे.
नागपुरात होणार अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र
महासंचालक प्रधान यांनी सांगितले की, एनडीआरएफ अकादमीला नागपुरातील सुरादेवी येथे १५३ एकर जागा मिळाली आहे. येथे अकादमीतर्फे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. या ठिकाणी डिझास्टर व्हीलेज तयार करण्यात येईल. यासोबतच रेल्वे, विमानतळ व औद्योगिक क्षेत्रात आलेल्या आपत्तीच्या वेळी कसा सामना करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसे मॉडेल उभारण्यात येणार आहे. एकूणच हे प्रशिक्षण केंद्र दक्षिण आशियातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र राहणार आहे.
प्रत्येक विद्यार्थी व नागरिकाला मिळावे प्रशिक्षण
आपत्ती व्यवस्थापन हे केवळ एका बटालियनपुरते मर्यादित नाही. सध्या एनडीआरएफच्या १२ बटालियन आहेत. चार बटालियनची आणखी मागणी करण्यात आली आहे. परंतु देशातील प्रत्येक नागरिक जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाने प्रशिक्षित होणार नाही तोपर्यंत याचे चांगले परिणाम दिसून येणार नाही. एनएसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडसह शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या प्रशिक्षित विद्यार्थ्यांची एक स्वयंसेवी फौज तयार केली जाईल, जी एका कॉलवर मदतीसाठी तयार होईल.