सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?
By योगेश पांडे | Published: February 16, 2024 10:31 PM2024-02-16T22:31:25+5:302024-02-16T22:32:42+5:30
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी ...
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी झाली तेथील रक्तांचे नमुने घेतले असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तेथे आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची बाबदेखील समोर आली आहे. अशा स्थितीत आता हे नवे डाग कुणाचे आहे या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
सना खानची २ ऑगस्ट २०२३ रोजी जबलपूर येथे आरोपी अमित साहू याने त्याच्या घरी हत्या केली होती. त्यानंतर त्याने सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी मोठी शोधमोहीम राबवूनदेखील मृतदेह सापडला नव्हता. पोलिसांनी या प्रकरणात साहूसह इतर आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी केली व डीएनए चाचणीदेखील करण्यात आली.
एका चाचणीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली. तेथे सना खानच्या रक्ताव्यतिरिक्त आणखी दोघांचे रक्तदेखील असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक महिला व एक पुरुष असल्याची माहिती अहवालातून कळाली. आता हे डाग नेमके कुणाच्या रक्ताचे होते याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासंदर्भात परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला. ते रक्ताचे डाग कुणाचे होते याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी कुणी आरोपी ?
सना खानची हत्या झाली त्यावेळी तेथे अमितव्यतिरिक्त आणखी कुणी आरोपी उपस्थित होते का याची पोलीस चौकशी करत आहेत. सना खानला मारहाण करत असताना आरोपी जखमी होऊन रक्त सांडले असल्याचीदेखील शक्यता आहे. या प्रकरणात एका मोलकरणीने सना खानचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला होता. मात्र नंतर ती महिला गायब झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला सापडली असून तिची चौकशी सुरू आहे.