गोंधळाशिवाय पार पडली ‘नीट’
By admin | Published: July 25, 2016 02:43 AM2016-07-25T02:43:42+5:302016-07-25T02:43:42+5:30
अखिल भारतीय स्तरावरील वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी रविवारी ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट) घेण्यात आली.
कडक नियमांची अंमलबजावणी : परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
नागपूर : अखिल भारतीय स्तरावरील वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी रविवारी ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट) घेण्यात आली. २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरात विविध केंद्रावर ही परीक्षा दिली. मागील अनुभव लक्षात घेता परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे यंदादेखील कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना नियमांची माहिती नव्हती त्यांना फटका बसला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील सात केंद्रांवर ‘नीट’ घेण्यात आली. यात विदर्भ आणि मराठवाडा मिळून केवळ एकच केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या भागांतील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी परीक्षेला आले होते. सकाळी १० ते १ ही परीक्षेची वेळ होती व त्यासाठी सकाळी ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आत यावे अशी प्रवेशपत्रावरच अट होती. परंतु विविध कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला. काही विद्यार्थी बाहेरगावाहून आले होते, तर अनेकांना परीक्षा केंद्रच दूर मिळाल्यामुळे ते शोधताना त्यांना उशीर झाला. परंतु नियमांनुसार विद्यार्थी वेळेत आले नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थी-पालकांनी परीक्षा देऊ देण्याची विनंती केली. परंतु नियमांचा हवाला देत परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला.(प्रतिनिधी)
पेपरचा ताण हलका झाला
मे महिन्यात झालेल्या ‘नीट’च्या तुलनेत यंदा पेपर सोपे होते. प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये फारशी अडचण गेली नाही असे विद्यार्थ्यांचे मत होते. पेपर चांगले गेल्यामुळे विद्यार्थी उत्साहात दिसून येत होते व महत्त्वाचा ताण दूर झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते.
कडक नियम
‘नीट’साठी अगोदरच नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली. ‘सीबीएसई’च्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांनी असेच कपडे घालून जाणे अपेक्षित होते, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे यंत्र लपविणे शक्य होणार नाही. ‘ड्रेस’ हा पूर्ण बाह्यांचा असू नये, त्यात मोठी बटन नसावी, कुठल्याही प्रकारचे दागिने घालू नयेत, जोड्याऐवजी चप्पल किंवा स्लीपर घालावी, अशा सूचना ‘सीबीएसई’कडून देण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थी सॅन्डल किंवा जोडे घालून आले होते. मुलांना मोजे, गॉगल्स, हँडबॅग, मोबाईल फोन्स, घड्याळे तसेच इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू यासारख्या गोष्टी परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आली होती.