नागपूरच्या केळीबाग रोडसाठी १३७.४१ कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:17 PM2018-09-26T23:17:43+5:302018-09-26T23:20:11+5:30
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
केळीबाग रोड २४ मीटर रुंदीचा केला जाणार आहे. परंतु यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. रोडच्या कामासाठी महापालिकेच्या मालकीच्या इमारती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सोबतच दुकाने व निवासी इमारती हटविण्याची गरज आहे. प्रकल्पग्रस्तांनी मोबदला म्हणून रोख रकमेची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेपुढे या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेज यादरम्यानच्या १०३० मीटर लांबीच्या प्रकल्पावर येणारा खर्च महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिका २९ सप्टेंबरच्या विशेष सभेत याबाबतचा प्रस्ताव पारित करून राज्य सरकाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे.
केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या अधिग्रहणावर ११६ कोटी ८१ लाख खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. जलवाहिनी स्थलांतरणावर तीन कोटी आठ हजार, विद्युतवाहिन्या दुसरीकडे हलविण्यासाठी २ कोटी २५ लाख तसेच स्थापत्य व अन्य बाबींवर जीएसटीसह १५ कोटी २७ लाखांचा खर्च होईल. नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिका राज्य सरकारकडे १२२ कोटी १४ लाखांच्या निधीची मागणी करणार आहे. विशेष म्हणजे रोड रुंदीकरणासाठी महापालिकेने हटविलेल्या दुकानदारांचा पुनर्वसन प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. दुकानदारांनी पर्यायी जागेची मागणी केली आहे.
आॅरेंज सिटीसाठी महामेट्रो २.५ टक्के रक्कम घेणार
वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफ पर्यंतच्या ३०.४९ हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येणारा आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विशेष सभेत मांडला जाणार आहे. या प्रकल्पावर खर्च होणाऱ्या एकूण रकमेच्या २.५ टक्के रक्कम महामेट्रो देणार आहे. २१ प्लाटपैकी प्रथम क्रमांकाच्या प्लाटवर मॉल उभारण्यात येणार आहे. याबाबतचा करार करण्याची तयारी करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार आॅरेंज सिटी स्ट्रीटचे काम महामेट्रोला निर्णय घेतला आहे.
सहापदरी मार्गासाठी रेल्वे स्टेशनचे पश्चिम गेट तोडणार
रेल्वे स्टेशनच्या पश्चिम गेट समोरील उड्डाण पूल तोडणे, यामुळे बाधित होणाऱ्या १७५ दुकानदारांचे पुनर्वसन व सहापदरी मार्गाचे निर्माण याबाबत महामेट्रो व महापालिका यांच्यात करार होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विशेष सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. सीआरएफ निधीतून या प्रकल्पासाठी २३४ कोटी २१ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सन २००८ साली १६ कोटी २३ लाख खर्च करून रेल्वे स्टेशन समोर १०.५ मीटर रुंद व ८१२ मीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्यात आला होता. येथे १७५ दुकान गाळे व सुलभ शौचालय उभारण्यात आले. रामझुल्याच्या दुसºया टप्प्याच्या बांधकामात बाधा निर्माण होणार असल्याने हा उड्डाणपूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.