दहशतवादापासून मुक्तीसाठी जागरुकता आवश्यक
By admin | Published: October 4, 2015 03:28 AM2015-10-04T03:28:43+5:302015-10-04T03:28:43+5:30
मुस्लीम समाज परस्पर विरोधी विचारधारांमुळे दहशतवादाप्रति अपेक्षित असल्याप्रमाणे सजग होऊ शकला नाही.
मुस्लीम धर्मगुरूंचे मत
नागपूर: मुस्लीम समाज परस्पर विरोधी विचारधारांमुळे दहशतवादाप्रति अपेक्षित असल्याप्रमाणे सजग होऊ शकला नाही. यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. देशातील काही समित्या आणि संस्थानही यासाठी जबाबदार आहेत. काही विदेशी समित्याही दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत.
या गंभीर समस्येपासून सुटका करण्यासाठी मुस्लिम समुदायाला जागरूक करणे अतिशय आवश्यक आहे, असे मत अहल्ले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन कौन्सिलच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीत सहभागी मुस्लीम धर्मगुरूंनी व्यक्त केले. भालदारपुरा येथील हज हाऊस येथे समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
या बैठकीत देशभरातील मुस्लिम धर्मगुरूंचा सहभाग होता. यापूर्वी मुस्लिम धर्मगुरूंच्या केंद्रीय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीदेखील दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा केली होती. वर्तमान स्थितीत सुन्नी वक्फ बोर्डाला केवळ सुन्नी बरेली मुस्लिम वक्फ बोर्डपर्यंतच सीमित ठेवावे. स्वतंत्रपणे शिया वक्फ बोर्ड आहे. त्याप्रमाणेच अन्य दुसऱ्या विचारधारेच्या मुस्लिमांसाठी वेगळा आणि स्वतंत्र वक्फ बोर्ड तयार करावा, अशी मागणी पंतप्रधानांना त्यावेळी धर्मगुरूंनी केली होती. अहले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन कौन्सिलचे महासचिव इंजिनिअर मोहम्मद हामिद म्हणाले, देशातील ८५ टक्के मुसलमान अहले सुन्नत बरेली विचारधारेचे आहेत. हे मुस्लीम सुफीवाद मानतात. पण वक्फ बोर्डाला असलेल्या राजकीय संरक्षणामुळे बहुसंख्यक मुस्लिम विचारधारेचे लोक मागे पडतात. वस्तुत: दरगाह, खानकाहो यांची देखरेख अहले सुन्नत विचारधारेचेच लोक करतात.
राजांच्या काळापासूनच सारी वक्फ प्रॉपर्टी सुन्नी बरेली मुस्लिमांची आहे. त्यामुळे त्यावर बरेली सुन्नी विचारधारेच्या लोकांचाच अधिकार असायला हवा.
मोहम्मद हामिद यांनी दावा केला की, बोको हरम, अल-कायदा, तालिबान, हिजबुलसारख्या दहशतवादी संघटन मुस्लिम समुदायातील काही युवकांची दिशाभूल करून देशात दहशतवादी कारवाया वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. काही समित्या आणि संस्थानांची या दहशतवादी संघटनांशी साठगाठ असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सुन्नी वक्फ बोर्डात सुन्नी बरेली मुस्लिमांचे नेतृत्व असल्याशिवाय या कारवाया थांबविणे कठीण आहे. यासंदर्भात त्यांनी ठोस अधिकृत पुरावा मात्र जाहीर केला नाही. याप्रसंगी अजमेर शरीफ दरगाहचे सज्जादानशी सय्यद सुलतान हसन चिश्ती, बरेली शरीफ (उत्तर प्रदेश)चे मौलाना तसलीम रजा, किछौछा शरीफ (उत्तर प्रदेश) दरगाहचे सज्जादानशी सय्यद अहमद अशरफ, बनारसचे शहर काजी मुफ्ती गुलाम यासीन, मध्य प्रदेशचे सूफी सैयद अब्दुल रशीद अली, चैन्नईचे मौलाना सैयद मन्सूर, जम्मू-काश्मीरचे मौलाना गुलजार, हैदराबादचे सैयद सूफी सलिम चिश्ती कादरी, झारखंडचे मौलाना इल्यास फैजी, कोलकाताचे मौलाना रईसूल कादरी, छत्तीसगडचे हारुन मेमन, हाजडी कादीर रिजवी आदी धर्मगुरु प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)