पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बिग डाटा संकल्पनेची गरज : विनोदकुमार तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:02 AM2019-08-08T01:02:42+5:302019-08-08T01:04:03+5:30
पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर वाढले असून पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) आयोजित पर्यावरणीय मॉडेलिंग : भविष्यातील समस्येचे निराकरण या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक आणि नीरीचे माजी संचालक डॉ. आर. एन. सिंग, नीरीच्या हवामान बदल विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जे. एस. पांड्येय, डॉ. आर. बी. बिनिवाले, वरिष्ठ प्रधान संशोधक डॉ. आभार सारगावकर उपस्थित होत्या. डॉ. विनोद कुमार तिवारी म्हणाले, भूगर्भातील पाण्याचा वापर सिंचनासाठी आणि उद्योगांसाठी बंद करण्याची गरज असून या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान असून त्यावर बिग डाटा, रिअल टाइम डाटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मात करता येणे शक्य आहे. डॉ. आर. एन. सिंग यांनी गणितीय मॉडेल पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रालॉजीचे माजी संचालक डॉ. आर. डी. सिंग यांनी पाण्याच्या व्यवस्थापनात हायड्रालॉजिकल मॉडेलिंगचे महत्त्व विशद केले. डॉ. के. सी. गौडा, डॉ. पी. व्ही. तिंबाडीया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला आयआयटी दिल्लीच्या प्रो. मैथिली शरण, आयआयटी रुरकीचे प्रो. बी. आर. गुर्जर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे, निरीच्या आशा पूर्णा मरंडी, स्वप्निल श्रीवास्तव उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जे. एस. पाण्ड्येय यांनी केले. आभार डॉ. सारगावकर यांनी मानले.