‘संस्कारी’त मेंदूची गरज

By admin | Published: July 27, 2014 01:28 AM2014-07-27T01:28:27+5:302014-07-27T01:28:27+5:30

ज्यावेळी मेडिकलचा विद्यार्थी होतो, त्यावेळी मेंदूच्या आजारावरील औषधे फार कमी होती. यामुळे न्यूरॉलॉजिस्ट होण्यास अनेक जण तयार होत नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे.

The need for brain in 'Sanskrit' | ‘संस्कारी’त मेंदूची गरज

‘संस्कारी’त मेंदूची गरज

Next

इंडियन अकादमी आॅफ न्यूरॉलॉजी : ‘ब्रेन जनजागृती सप्ताह’
नागपूर : ज्यावेळी मेडिकलचा विद्यार्थी होतो, त्यावेळी मेंदूच्या आजारावरील औषधे फार कमी होती. यामुळे न्यूरॉलॉजिस्ट होण्यास अनेक जण तयार होत नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. खूप सारी औषधे उपलब्ध आहेत. मेंदूच्या अनेक असाध्य आजारांवर उपचार आहेत. परंतु आज समाजाला संस्कारीत मेंदूची गरज आहे. त्याची उणीव दिसून येत आहे. यामुळे अत्याचार, गुन्हे वाढत आहे. आपली जबाबदारी ओळखण्याची आज खरी गरज आहे, असे विचार वरिष्ठ न्यूरॉलॉजिस्ट डॉ. जी. एम. टावरी यांनी येथे मांडले.
इंडियन अकादमी आॅफ न्यूरॉलॉजीच्यावतीने आयोजित मेंदू दिनानिमित्त ‘ब्रेन जनजागृती सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी आयएमए सभागृहात ‘मेंदूचे आरोग्य आणि आजार’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती उपस्थित होते. यावेळी मंचावर इंडियन अकादमी आॅफ न्यूरॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रवीण वराडकर, डॉ. यशवंत पत्की, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव अनुपम सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. टावरी म्हणाले, आपला मेंदू चाकूसारखा आहे. जसा चाकूचा वापर न झाल्यास जंग चढतो, म्हणून त्याला नेहमी धार द्यावी लागते, तसेच मेंदूचे आहे. चांगले वाचन, सवयी आणि आहाराकडे लक्ष दिल्यास मेंदू तरतरीत राहण्यास मदत होते.
साठी गाठलेल्या सेवानिवृत्तांना उद्देशून ते म्हणाले की, नोकरीतून निवृत्त झाले तरी जीवनातून निवृत्त होऊ नका. ‘आय एम आॅलवेज यंग’ असे स्वत:ला बजावत रहा. स्वत:ला गुंतवून ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मेंदूच्या आजाराबाबत अंधश्रद्धा
खासदार विजय दर्डा म्हणाले, मेंदूलाच लहानपणापासून संस्कारीत करा. यासाठी शाळां-शाळांमधून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. अनेक पाश्चात्त्य देशांत ही पद्धत अवलंबली जात आहे. यामुळे औषधांपूर्वीच विचार पोहचत आहे. शरीराचे सर्व काम मेंदूमार्फतच चालते. त्याच्यावर आजही संशोधन सुरू आहे. अनेक गोष्टी रहस्यमय आहेत. यामुळे जेवढ्या गोष्टी माहीत आहेत त्याला घेऊन जनजागृती करणे, आजार होऊ न देण्याविषयी माहिती देणे, काळजी घेण्याचे महत्त्व सांगणे हे एक मोठे कार्य आहे. ही जनजागृती शिक्षणाच्या माध्यमातून झाल्यास त्याला व्यापक स्वरूप येईल. पक्षाघात, मिरगी हे मेंदूचे आजार आहेत. परंतु या आजारांना घेऊन अनेकांमध्ये अंधश्रद्धा आहे. शिक्षणातून ही अंधश्रद्धा दूर करणे शक्य आहे. आज स्पर्धेचे युग आहे. आईवडिलांसोबत विद्यार्थीही तणावात आहेत. एका संशोधनातून ४० टक्के विद्यार्थी तणावात असल्याचे समोर आले आहे. यावरही जनजागृती होणे आवश्यक आहे. सरकार आरोग्यावर फक्त दोन टक्के खर्च करते. हे इतर देशाच्या तुलनेत फार कमी आहे. प्रतिबंधात्मक पद्धतीवर सरकार एकही पैसा खर्च करीत नाही. यामुळे एखाद्या अवयवाला घेऊन होत असलेली ही जनजागृती फार महत्त्वाची आहे. खासदार अजय संचेती म्हणाले, आपली शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित आहे. यामुळे या अवयवावरील जनाजगृती फार महत्त्वाची आहे. प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. यावेळी मेंदूच्या विविध आजारावर न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दिनेश काबरा, डॉ. प्रफुल्ल शेंबाळकर, डॉ. पौर्णिमा करंदीकर आणि डॉ. संग्राम वाघ यांनी मार्गदर्शन केले. या जनजागृती सप्ताहाला नागपूर न्यूरो सोसायटी, इंडियन सायक्याट्रीक सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व बसोली ग्रुपचे सहकार्य मिळाले आहे. संचालन डॉ. सुधीर फावे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The need for brain in 'Sanskrit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.