सामाजिक मतैक्य घडविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:34 AM2018-11-24T01:34:46+5:302018-11-24T01:37:41+5:30
आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत नाही. अशा आकसपूर्ण साहित्यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे निर्माण झाले आहे. साहित्याच्या अशा जातवार पेरणीतून मतभेदाचे चित्र उभे केले जात असताना साहित्यिकांनी मूक राहणे योग्य होणार नाही. अशावेळी खऱ्या साहित्यिकांनी सामाजिक मतैक्य साधून ते साहित्यात मांडावे, असे आवाहन अमरावतीच्या श्रीराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत नाही. अशा आकसपूर्ण साहित्यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे निर्माण झाले आहे. साहित्याच्या अशा जातवार पेरणीतून मतभेदाचे चित्र उभे केले जात असताना साहित्यिकांनी मूक राहणे योग्य होणार नाही. अशावेळी खऱ्या साहित्यिकांनी सामाजिक मतैक्य साधून ते साहित्यात मांडावे, असे आवाहन अमरावतीच्या श्रीराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून केले.
साहित्य विहार संस्थेच्यावतीने कुसुमताई वानखेडे सभागृहात शुक्रवारी अक्षर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनसत्रात ‘वर्तमान साहित्यिकांपुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ लेखिका डॉ. सुप्रिया अय्यर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष आशा पांडे, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अरविंद देशमुख पुढे म्हणाले, आज प्रेयस आणि श्रेयस अशी साहित्याची विभागणी झाली आहे. सोशल मीडियावर आपल्या लेखनाला किती लाईक्स मिळतील, अशा प्रेयस साहित्याला महत्त्व दिले जाते. मात्र वाचकांच्या अंत:करणाचा ठाव घेते व जीवन सृजन करते ते खरे श्रेयस साहित्य होय, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. शेकडो वर्षापूर्वी निर्माण झालेले संत साहित्य हे समाजाच्या मनात शांत भाव व आत्मशांती निर्माण करणारे होते, म्हणून ते समकालीन व अपडेट असल्यासारखे वाटते. वर्तमान काळात समाजाला व मानवाच्या जगण्याला घेऊन चालणाऱ्या साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. जे प्रत्येकाच्या मनात चेतना व प्रेरणा निर्माण करते, असे साहित्य निर्माण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. सुप्रिया अय्यर यांनी मराठी भाषेच्या व मराठी शाळांच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली. मराठी भाषा लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. इंग्रजीच्या आक्रमणामुळे इतर राज्यातील भाषांची अवस्थाही वाईट आहे. अशावेळी आपली भाषा जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. आपली संस्कृती ही आपल्या भाषेतील साहित्यातून प्रवाहित होते. त्यामुळे ही भाषा टिकली पाहिजे.
मराठी भाषेतील शब्दांचा गोडवा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उद््घाटन सत्राचे संचालन प्रा. रेखा घिया-दंडिगे यांनी केले. संस्कृ त मार्गदर्शक डॉ. मनीषा यमसनवार यांनी प्रास्ताविक केले.
मराठी विद्यापीठ निर्माण व्हावे
डॉ. अरविंद देशमुख यांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांचा आकडा घसरत चालल्याची चिंता व्यक्त करीत भाषेचे आक्रमण आपल्याला आपल्या संस्कृतीपासून दूर नेत असल्याची भावना व्यक्त केली. मराठी भाषा ही स्पर्धा परीक्षा व संगणकीय वापराच्या दृष्टीने योग्य नसल्याचे बोलले जाते. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी विद्यापीठ निर्मितीच्या मागणीचा ठराव साहित्य संमेलनात पारित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लीना रस्तोगी यांना ज्ञानयोगी पुरस्कार
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संस्कृत पंडिता म्हणून ओळख असलेल्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ. लीना रस्तोगी यांना ज्ञानयोगी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिकेच्या संपादक डॉ. अर्चना अलोणी यांनी भूमिका विशद करताना स्मरणिकेत विदर्भाच्या प्राचीन व आधुनिक इतिहासासह धार्मिक, सांस्कृतिक व साहित्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आल्याचे सांगितले. डॉ. पंकज चांदे यांनी भाषेवर संकट आल्याची भीती व्यक्त केली. साहित्याच्या बाबतीत केवळ पुणे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र समजले जात असल्याने, विदर्भातील साहित्याची उपेक्षा होत असल्याची खंत व्यक्त केली. डॉ. माधुरी वाघ यांनी या सत्राचे संचालन केले. यानंतरच्या सत्रात ‘कवितेचा गाव’ या कार्यक्रमातून प्राचीन, अर्वाचीन व आधुनिक काव्यरचना प्रकारांची संगीतमय प्रस्तुती झाली.