शोषणमुक्त समाजनिर्मितीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:22+5:302021-02-05T04:38:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : अत्यंत कठीण आणि विपरीत परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, नगरसेवक आदींनी पहिली भंगीमुक्त नगरपालिका करीत खऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : अत्यंत कठीण आणि विपरीत परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, नगरसेवक आदींनी पहिली भंगीमुक्त नगरपालिका करीत खऱ्या अर्थाने त्या काळात वंचितांना सामाजिक न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मान उंचावणारे कार्य उमरेड पालिकेने केले असून, शोषणमुक्त समाजनिर्मितीची गरज असल्याची मौलिक बाब अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केली. त्या काळात ग्रामसुधारणेची ही चळवळ खरोखरच वंचितांना न्याय मिळवून देणारीच असल्याचेही मत त्यांनी मांडले.
राज्यातील पहिली भंगीमुक्त नगरपालिका करण्यासाठी विशेष सेवा कार्य करणाऱ्या आणि स्वच्छतादूत ठरलेल्या २८ माजी नगरसेवकांसह ४१ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन उमरेड येथे करण्यात आले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी संवाद साधला. राष्ट्रपिता फांऊडेशन, नगर परिषद आणि नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त वतीने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पंडित दिनदयाळ उपाध्याय नाट्यगृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू पारवे होते. माजी मंत्री डॉ. श्रा. गो. पराते, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, पतसंस्थेचे अध्यक्ष जगदीश पटेल, बंडू शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती.
माजी मंत्री डॉ. श्रा. गो. पराते, गुलाब भुजाडे, बाबुराव चाचरकर, बबन ठाकरे, सुमन इटनकर, अकबर मोहम्मद पटेल आदींसह ६९ जणांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पहिल्या भंगीमुक्त पालिकेच्या त्या काळातील आठवणींनी सारेच भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र झाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एकनाथ पवार यांनी केले. प्रशांत राऊत यांनी आभार मानले. मनीष शिंगणे, श्वेता भिसे, डॉ. संगीता चव्हाण, रविकुमार कावळे, प्रकाश जुमडे, दिलीप चव्हाण, प्रणय पराते आदींनी यासाठी सहकार्य केले.