एसटीचे शासनात विलिनीकरणासाठी लढा देण्याची गरज : शीला नाईकवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 09:53 PM2020-02-01T21:53:24+5:302020-02-01T21:55:18+5:30
एसटी महामंडळ आर्थिक टंचाईत सापडले आहे, आवश्यकता नसताना खासगीकरण करण्यात येत असून या सर्व बाबींवर उपाय म्हणून एसटीचे शासनात विलिनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळ आर्थिक टंचाईत सापडले आहे, आवश्यकता नसताना खासगीकरण करण्यात येत असून या सर्व बाबींवर उपाय म्हणून एसटीचे शासनात विलिनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी केले.
एसटी कामगार संघटनेच्या नागपूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा आग्याराम देवी चौकातील गुरुदेव सेवाश्रमात आयोजित करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य महिला उपाध्यक्ष आशा घोलप होत्या. व्यासपीठावर संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे, कोषाध्यक्ष रवी सोमकुवर, जगदीश पाटमासे, शशिकांत वानखेडे उपस्थित होते. शीला नाईकवाडे यांनी महिलांचे सक्षमीकरण, संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एसटीचे शासनात विलिनीकरणासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती येथून निर्भया परिक्रमा नागपुरात दाखल झाली. महिला मेळाव्यात कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचाराचा कार्यस्थळावर होणारा परिणाम याबाबत महिला कामगारांमध्ये जाणीव जागृती करून प्रश्नावलीच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधण्यात आला. मेळाव्याला नागपूर विभागाच्या मीना केने, माधुरी ताकसांडे, सीमा जिल्लेला आणि विभागातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्यात उज्ज्वला पिंगळे, सरु सातपुते, सुनिता बेदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मीना केने-बोंद्रे यांनी केले. संचालन दीपाली गुजरकर यांनी केले. आभार माधुरी ताकसांडे यांनी मानले.