त्यासाठी निसर्गात कलाकृती शोधावी लागेल : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:47 PM2019-03-22T23:47:19+5:302019-03-22T23:49:28+5:30
मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.
वनराई फाऊंडेशन तसेच महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी द्वादशीवार बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, पोलीस महानिरीक्षक (अॅन्टी नक्षल स्क्वॉड) सुरेश शेलार, बी.के. सिंग, प्रकाश ठोंबरे, गोपाळराव ठोसर, वनराईचे गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी द्वादशीवार यांनी सप्रे यांचा कलात्मक परिचय करून दिला. हा सत्कार व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार किंवा कलाकाराचा नाही तर विद्वानाचा आहे. व्यंगचित्रकार म्हणून लोकांचे अंतर्मन वाचणाची कुवत त्यांच्यात आहे. त्यांनी झाडापासून तुटून पडलेल्या निराकार लाकडांमध्ये कलात्मक आकार शोधला व तो पाहण्याची दृष्टी दिली. ही कला इतकी वर्षे निष्ठेने जपली आणि तरुणांपर्यंत पोहचविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषणावरही चिंता व्यक्त केली. प्रदूषण रोखण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागणार आहे. तीन वर्षात ५० वाघ आणि २६३ बिबटे मारले गेले. हे रुबाबदार प्राणी कसे जगतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वनखात्याच्या धोरणात मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे आवाहन द्वादशीवार यांनी केले.
यावेळी नितीन काकोडकर यांनी मनोहर सप्रे यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. २० वर्षापूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी २००० सालापर्यंत वाघ नाहिसे होतील, असे भाकीत केले होते. मात्र असे झाले नाही. उलट वाघांची संख्या वाढल्याचे सांगत यासाठी वनविभागाला श्रेय द्यायला हवे, असे मनोगत मांडले. वाघांची वाढ आणि त्यांचे मृत्यू हे निसर्गाचे चक्र असल्याचेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देत मनोगत मांडताना मनोहर सप्रे यांनी निसर्गाशी चाललेल्या मानवी स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली.
आपण निसर्गापासून पूर्णपणे तुटलो आहोत व शहरी लोकांना दररोज ही शोकांतिका सोसावी लागते. मानव प्राण्याला जगण्यासाठी निसर्गाजवळ सर्व काही आहे, पण माणूसच अतृप्त आहे. नैसर्गिक साधनांचा बेमालूम वापर, जमेल तेवढी लूट केली जात आहे. माणसांचा चंगळवाद हा व्यसनाप्रमाणे झाला असून त्यातून बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. न्यूनतम साधनातून महत्तम आनंद कसा घ्यावा, हे आदिमानव किंवा बालकांकडून शिकता येते. वडीलधारे मात्र या बालकांना निसर्गापासून तोडत असल्याची खंत त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन वनराईचे विश्वस्त अजय पाटील यांनी केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.