तत्काळ मदत हवीय? डायल करा ११२ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 08:00 AM2023-02-10T08:00:00+5:302023-02-10T08:00:02+5:30
Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून कठीण प्रसंगात पोलिसांची मदत घेतल्याची माहिती आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : धावपळीच्या युगात अनेकदा व्यक्तीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. गृहिणींना कुटुंबातून छळण्याच्या घटना घडतात. अडचणीत असलेल्या अशा नागरिकांसाठी पोलिसांनी डायल ११२ ही सेवा सुरू केली असून, फोन केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित व्यक्तीला पोलिसांची मदत मिळत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून कठीण प्रसंगात पोलिसांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती आहे.
काय आहे डायल ११२ मराठी?
-डायल ११२ ही अडचणीत असलेल्या सर्व व्यक्तींसाठी महत्त्वाची सेवा आहे. या सेवेवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीला दहा मिनिटांच्या आत पोलिस संपर्क साधून हवी ती मदत करतात. या सेवेप्रती नागरिक जागरूक झाले असून, मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे.
वर्षभरात ८७ हजार ३३ कॉल्स
-नागपूर शहरात डायल ११२ या सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अडचणीत असलेले व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊन अडचणीच्या काळात पोलिसांची मदत घेत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ८७ हजार ३३ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतल्याची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे.
१०० टक्के कॉल पूर्ण
-वर्षभरात ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२ सेवेचा लाभ घेतला आहे. या सर्वच कॉलला नागपूर पोलिसांनी प्रतिसाद देऊन संबंधित नागरिकांना मदत मिळवून दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
१०८ वाहने २४ तास कार्यरत
-अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ ही सेवा २४ तास कार्यरत असते. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्रीलाही या सेवेवर संपर्क साधल्यास नागरिकांना त्वरित मदत करण्यात येते. त्यासाठी नागपूर शहरात २४ तास १०८ वाहने सज्ज राहतात.
१८५ कर्मचाऱ्यांचा ताफा
-डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्वरित पोलिसांच्या वतीने मदत करण्यात येते. त्यासाठी नागपूर शहर पोलिस विभागात १८५ कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत असून, ते अडचणीतील नागरिकांना त्वरित मदत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.
दहा मिनिटांच्या आत मदत
-आपत्कालीन स्थितीत डायल ११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर संबंधित पोलिस तक्रारकर्त्या व्यक्तीची अडचण जाणून त्याची नोंद करतात. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित व्यक्तीला मदत पोहोचविण्यात येते. त्यामुळे ही सेवा अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.
सर्वाधिक तक्रारी कशाच्या?
-नागपूर शहरात गेल्या वर्षभरात ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून मदत मागितली आहे. यात सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक वादाच्या असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अडचणीतील व्यक्तींसाठी डायल ११२ सज्ज
‘डायल ११२’ या सेवेंतर्गत अडचणीत असलेल्या व्यक्तीला अवघ्या १० मिनिटांत पोलिसांच्या वतीने मदत पोहोचविण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या समस्येचे निराकरण करावे.
-अश्वती दोरजे, सहपोलिस आयुक्त, नागपूर शहर
.........