समाजाला चालत्या-बोलत्या आदर्शांची आवश्यकता : वेदप्रकाश मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:43 AM2018-12-15T00:43:21+5:302018-12-15T00:46:15+5:30
समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२ व्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणाऱ्या स्मिता स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार दत्ता मेघे, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विकास शिरपूरकर, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके प्रामुख्याने उपस्थित होते. बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सुजोग चिकित्सक डॉ. आशा सारडा, ज्येष्ठ नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रभाकर दुपारे तसेच नाट्यलेखक व दिग्दर्शक सलीम शेख यांना यावर्षीच्या स्मिता स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. मिश्रा पुढे म्हणाले, पद्मश्री स्मिता पाटील या रंगभूमी, नाट्यभूमी आणि सामजिक क्षेत्रातील उत्कट संवदेनशीलतेचे प्रतीक आहे. कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून मानवी अंतर्मनाच्या संवेदनांना स्पर्श करणारी असते. ती जीवनाचा परमोच्च आनंद देणारी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्तकेले.
वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना दत्ता मेघे म्हणाले, सार्वजनिक जीवनात सामाजिक जाणिवा ठेवून माणस जपणे व सामाजिक कार्यासाठी त्यांची निवड करणे हेसुध्दा मोठ्या जोखमीचे काम असून गिरीश गांधी ते करीत असल्याचे कौतुक त्यांनी केले. न्या. सिरपूरकर म्हणाले, कला हीे सर्जनशील असते, ज्यातून नवीन काही निर्माण होते. स्मिता ही अशीच सर्जनशील व संवेदनशील अभिनेत्री होती. पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती असेच नाविन्य निर्माण करणारे सर्जनशील व्यक्तिमत्त्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सन्मानाला उत्तर देताना प्रभाकर दुपारे यांनी, आमच्या कलेचा हेतू मनोरंजनापेक्षा समाजपरिवर्तनाचा अधिक असल्याची भावना व्यक्त केली. नाटकाच्या माध्यमातून पुरोगामी विचाराची प्रेरणा निर्माण व्हावी व सामाजिक जाणिवा पेटून उठाव्या हा उद्देश असल्याचे ते म्हणाले. विदर्भात पथनाट्याला सुरुवात केली तेव्हा लोक त्यावेळी तिरस्कार करायचे. मात्र आम्ही मागे हटलो नाही. आज हे पथनाट्य परिवर्तनाचे प्रतीक ठरल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सलीम शेख यांनी मनोगत व्यक्त करताना, मागील २० वर्षांपासून सोबतीने काम करणारे कलावंत आणि तंत्रज्ञ आणि मार्गदर्शक, बातम्यातून विषय देणारे पत्रकार, अनिल चनाखेकर, राजाराम दीक्षित वाचनालयाचे किशोर बांधवकर, पातूरकर, गुरुतुल्य नीलकांत कुलसंगे व पत्नी नलिनी यांची साथ लाभल्याची भावना व्यक्त केली. डॉ. आशा सारडा यांनी सुजोग चिकित्सेद्वारे औषधोपचाराशिवाय रुग्णाला आराम मिळतो. त्यामुळे या पॅथीचे हॉस्पिटल व महाविद्यालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले.