पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 09:34 PM2019-06-05T21:34:15+5:302019-06-05T21:36:32+5:30

वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी केले.

Need for people movement for environmental protection: Mayor Nanda Jichakar | पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ देताना ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी.

Next
ठळक मुद्देमनपा-ग्रीन व्हिजीलतर्फे चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौरनंदा जिचकार यांनी बुधवारी केले.
पर्यावरण दिनानिमित्त महापालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे रघुजी भोसले नगरभवन येथे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.
महापालिका ग्रीन व्हिजीलच्या सहकार्याने पर्यावरण रक्षणात जनजागृतीचे कार्य करीत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक झाड वाचविण्याची भूमिका मनपाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करून महापौरांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत जनजागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
सन १९७२ मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्सदरम्यान ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. १९७४ साली पहिल्यांदा पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी एका थीम आधारित पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘बीट एअर पोल्युशन’ ही थीम असून त्यावर आधारित मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आले. नदी-तलावातील वाढते प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, ऊर्जा बचत, हरित संकल्प, नैसर्गिक संपदेचे संरक्षण आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना लहान-लहान नाटकांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलच्या विचारांचे आदानप्रदान केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदूषण थांबविण्याची आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
संचालन शुभांगी पोहरे यांनी तर प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, दिगांबर नागपुरे, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, रजत जैस्वाल, रुचि सोनी, दादाराव मोहोड, इंद्रायणी ठाकरे, चिन्मय धिमान, अभिषेक वैद्य, कुणाल बोरकर, ईशा सगदेव, गौतमी ठाकरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या खताच्या पिशव्या भेट
मनपाच्या लालबहादुर शास्त्री माध्यमिक शाळा व डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा आणि संजय पुंड यांच्या मार्गदर्शनात शाळा परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती केली. या खताच्या पिशव्या महापौर व अन्य मान्यवरांना भेट दिल्या.

 

Web Title: Need for people movement for environmental protection: Mayor Nanda Jichakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.