गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:22 AM2017-08-05T02:22:52+5:302017-08-05T02:23:27+5:30
आता पारंपरिक शिक्षणावर अवलंबून चालणार नाही. देशाच्या उभारणीत ते कधीच पुरे पडणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता पारंपरिक शिक्षणावर अवलंबून चालणार नाही. देशाच्या उभारणीत ते कधीच पुरे पडणार नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानयुक्त अशा शिक्षणाची गरज आहे. तेव्हाच खºया अर्थाने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९४ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी गुरुनानक भवन सभागृहात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानयुक्त विद्यार्थी निर्माण करताना त्याच तोडीच्या शिक्षकांचीही विद्यापीठांना गरज पडणार आहे. शिक्षण व्यवस्थेत राहून स्वतंत्र विचार मांडू शकतील असे विद्यार्थी आणि शिक्षक घडविण्याचे काम विद्यापीठांना करायचे आहे. यासाठी रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म या त्रिसूत्रीने शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर होइल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कुलगुरू डॉ. काणे यांनी भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना विद्यापीठाने उत्तम दर्जाचे संशोधन करून त्यात सहभागी होण्याचा संकल्प विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी करावा, असे आवाहन केले.
डॉ. प्रमोद येवले यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. तर कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी आभार मानले.
विविध पुरस्कार वितरित
यावेळी विद्यापीठातर्फे विविध पुरस्कार वितरित करण्यात आले. यात आदर्श शिक्षण संस्था म्हणून नवयुवक शिक्षण संस्था अत्रे लेआऊट, तर आदर्श अधिकारी म्हणून सहायक कुलसचिव मोतीराम तडस यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेत हिस्लॉप कॉलेजला सन्मानित करण्यात आले. यासह आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी सलीम शाह शब्बीर शाह, महेंद्र पाटील, वासुदेव हरडे, मुरलीधर हेडावू, उत्कृष्ट विद्यार्थी संकेत निकोसे, इमरान ओपाई, बरखा शेंडे, प्रज्ञा देवघरे आदींचा सत्कार करण्यात आला.