रेल्वेस्थानकावर हवी एसी दुरुस्त करण्याची यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2016 03:23 AM2016-07-06T03:23:39+5:302016-07-06T03:23:39+5:30
एसीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित एसी कोचमध्ये बसणे प्रवाशांना कठीण होते. त्यांचा जीव गुदमरतो.
प्रवाशांची गैरसोय : नेहमीच होतो गोंधळ
नागपूर : एसीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित एसी कोचमध्ये बसणे प्रवाशांना कठीण होते. त्यांचा जीव गुदमरतो. नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी गोंधळ घालतात. परंतु तरीसुद्धा एसीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेस्थानकावर यंत्रणा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर एसीतील बिघाड दुरुस्त करणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
सोमवारी सायंकाळी रेल्वेगाडी क्रमांक १२५१२ राप्तीसागर एक्स्प्रेसच्या बी २ कोचचा एसी नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांनी एकच गोंधळ घालून ही गाडी एक तास रोखून धरली. एसी दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेऊन तब्बल १२ वेळा चेन पुलिंग केले. अखेर एसी दुरुस्त करणारे कर्मचारी या गाडीसोबत रवाना करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेऊन ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. एखाद्या कोचमधील एसी नादुरुस्त झाल्यास त्या कोचमधील प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटते. एसी कोचचे काच बंद असल्यामुळे हवा आत येण्यास काहीच पर्याय नसतो. याशिवाय एसीसाठी अधिक पैसे मोजून ती सुविधा न मिळाल्यास प्रवाशांचा संताप होतो. नागपूर रेल्वेस्थानकावर एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना नेहमीच घडतात. परंतु तरीसुद्धा एसी दुरुस्त करणारे तांत्रिक कर्मचारी येथे उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. अनेकदा प्रवाशांना पुढील रेल्वेस्थानकावर एसी दुरुस्त करून देऊ असे आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ११० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एसीतील बिघाड दुरुस्त करणारी यंत्रणा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.(प्रतिनिधी)
सुरक्षा यंत्रणेची तारांबळ
एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवासी चेनपुलिंग करून रेल्वेगाडी रोखून धरतात. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कसरत करून प्रवाशांची समजूत काढावी लागते. अनेकदा प्रवासी आक्रमक झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेस्थानकावर यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.