देश एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज : प्रेमकुमार बोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:03 PM2019-02-19T23:03:49+5:302019-02-19T23:05:08+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला. आज धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला. आज धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मंगळवारी केले.
मराठा सेवा संघ, बानाई, जमाते इस्लामे हिंद व सर्वशाखीय कुणबी संघटनातर्फे छत्रपती शिवराय संयुक्त नागरी जन्मोत्सव २०१९ निमित्त सुर्वेनगर येथील सेवा संघाच्या लॉनवर आयोजित ‘छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष धोरण, आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान देताना बोके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे होते.
व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, माजी मंत्री विनोद गुडधे-पाटील, ओबीसी महासंघाचे नेते प्रा. बबनराव तायवाडे,अनंतराव घारड,बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे,बानाईचे माजी अध्यक्ष प्रदीप नगराळे, अखिल कुणबी समाज अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, जमाते इस्लामी हिंद नागपूर मध्यचे अध्यक्ष अशरफ बेलीम, जमाते इस्लामी हिंद, नागपूर शहर (महिला)अध्यक्ष डॉ. साबिहा खान,कुणबी सेनेचे अध्यक्ष सुरेश वर्षे, डॉ.जयेश तिमाने, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम कडू, झाडे कुणबी समाज अध्यक्ष राजेश चुटे, जाधव कुणबी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष प्रा.दिनकर जिवतोडे, अखिल तिरळी कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील राऊ त, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष चंदकांत नवघरे, बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष दत्तू निंबर्ते, अ.भा. खेडुले कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामकृष्ण ठेंगडी, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीचे साहेबराव करडभाजने, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके, कार्याध्यक्ष श्याम डहाके, शहर अध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, जिजाऊ बिग्रेडच्या विभागीय अध्यक्ष सुनीता जिचकार, जिल्हाध्यक्ष जया देशमुख, जिजाऊ बिग्रेडच्या शहराध्यक्ष अनिता ठेंगरे, संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष अभिजित दळवी आदी उपस्थित होते.
प्रेमकुमार बोके म्हणाले, ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधनातून शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार घराघरात पोहोचविण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाचा हाच प्रयत्न आहे. म्हणूनच आज जगभरातील ५० देशात शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंती हा बहुजन समाजाचा उत्सव झाला आहे. शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला असल्याने नवीन पिढीला त्यांचा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधन मेळावे आयोजित करून शिवरायांचा विचार देशभर पोहोचविण्याचे प्रयत्न असल्याचे मधुकर मेहकरे यांनी सांगितले.पी.एस.खोब्रागडे म्हणाले, शिवाजी महाराज मुस्लीम, दलित व बहुजनांचे राजे होते. प्रदीप नगराळे म्हणाले, शिवाजी धर्मनिरपेक्ष राजे होते. अशरफ बेलीम म्हणाले, शिवाजी महाराजांची मुस्लीमविरोधी असल्याची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.डॉ. साबिहा खान म्हणाल्या, शिवाजी रयतेचे राजे होते. त्यांच्या सैन्यात ६६ हजार मुस्लीम सैनिक होते. ते खरे धर्मनिरपेक्ष होते. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, नरेंद्र जिचकार, जयेश तिमाने आदींनी विचार मांडले,पंकज निंबाळकर यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. दिलीप खोडके यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अरुणा भोंडे यांनी केले.