हुडकेश्वरच्या विकासाला हवी गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:29 AM2017-10-25T01:29:47+5:302017-10-25T01:30:01+5:30
नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. परंतु मूलभूत समस्यांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पारडी, पुनापूर, वाठोडा आदी भागातही समस्यांचा डोंगर आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हुडकेश्वर-नरसाळा भागातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने १२५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. यात पाण्याची पाईप लाईन व जलकुंभ, स्मशानभूमी, गडर लाईन पावसाळी नाल्या आदी कामांचा समावेश आहे. परंतु विकास कामांची गती संथ आहे. तसेच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
हुडके श्वर येथील मुख्य रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा करण्यात आला. परंतु कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी सिमेंट रोडच्या कामाची त्रयस्तामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, यासाठी प्रभाग २९ मधील नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज होती.
प्रभागातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. परंतु सहा महिन्यांत महापालिका सभागृहात एकदाही या भागातील समस्या मांडलेल्या नाही. हुडकेश्वर- नरसाळा परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परंतु कामाला गती नाही. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. गडर लाईनची कामे सुरू आहे. परंतु कामाला गती नाही. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच पावसाळी नाल्यांचा अभाव आहे. असे असूनही निवडणुकीनंतर सुविधा नसलेल्या वस्त्यात नगरसेवकांचे दर्शन झाले नसल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.
टँकरद्वारे पाणीपुरवठा
शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु पाईप लाईन टाकण्याचे काम संथ आहे. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यात पाईप लाईन टाकण्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी विकासाची ग्वाही दिली होती. परंतु आता त्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
डासांमुळे नागरिक त्रस्त
प्रभाग २९ मध्य मोठ्या प्रमाणात रिकामे प्लाट आहेत. पावसाळ्यात या प्लाटमध्ये पाणी साचले होते. अजूनही काही ठिकाणी डबक ी साचली आहेत. त्यातच कचरा साचला असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने डास नियंत्रणासाठी तातडीने उपायोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
उद्यानांचा अभाव
हुडकेश्वर-नरसाळा भागातील लोकसंग्या ५० हजाराहून अधिक आहे. परंतु या परिसरात एकही उद्यान नाही. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, स्मशान भूमीचे बांधकाम, गडर लाईन, पावसाळी नाल्या, पथदिवे, शाळा, उद्यान अशा स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही दिली होती. परंतु निवडून आल्यानंतर नगरसेवकांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.
नदीला संरक्षण भिंत नाही
हुडकेश्वर-नरसाळा भागातून पोरा नदी वाहते. नदीलगत नागरिकांनी घरे उभारलेली आहेत. परंतु नदीला संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात पुराचे पाणी वस्त्यांत शिरण्याचा धोका असतो. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेने संरक्षण भिंत उभारावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सभागृहात सभापती गप्पच
हुडकेश्वर - नरसाळा भागातील विकास कामांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे. परंतु विकास कामे करण्याची महापालिकेचीही जबाबदारी आहे. या संदर्भात प्रभागातील नगरसेवक व झोनचे सभापती भगवान मेंढे यांनी सभागृहात प्रश्न मांडणे अपेक्षित होते. मात्र गेल्या सहा महिन्यात मेंढे सभागृहात एकदाही बोललेले नाही.