‘उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्र मजबूत करण्याची गरज’ - गजेंद्रसिंह शेखावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:41 AM2017-12-17T00:41:56+5:302017-12-17T00:42:17+5:30
उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.
नागपूर : उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.
शेखावत यांनी शनिवारी ‘लोकमत भवना’ला सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय चमूसोबत चर्चा केली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.
कृषी क्षेत्राचे तीन कारणांमुळे नुकसान झाले आहे. ६२ टक्के कृषीक्षेत्र भूजलावर अवलंबून असून पाणीपुरवठा अपुरा आहे. रासायनिक खतांच्या अतोनात वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे आणि तिसरे कारण म्हणजे कौटुंबिक विभाजनामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. देशात भूधारकाकडे सरासरी ०.८ एकर जमीन असल्यामुळे शेती अप्रभावी झाली आहे, असे शेखावत यांनी सांगितले.
शेखावत यांनी उद्योजक म्हणून इथियोपिया आणि आॅस्ट्रेलिया या देशांमध्ये १२ हजार एकर जमीन घेतली आहे. आॅस्ट्रेलियातील लोकशाही सरकारतर्फे विदेशी गुंतवणूकदारांना पाच वर्षांपर्यंत कर माफ करून कृषी जमीन लीजवर दिली जाते. पाच वर्षांनंतर जमिनीतून होणाºया उत्पन्नावर ३० टक्के आयकर द्यावा लागतो. इथियोपिया येथील बहुतांश जमीन पडीक असून या जमिनीचा एक मीटरपर्यंतचा थर उपजाऊ आहे. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते. भारतात हा थर केवळ १० इंच आहे. आदीस अबाबाजवळील जमीन गुलाबाच्या फुलांसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे इथियोपिया जगात सर्वाधिक फूल उत्पादक देश बनला आहे. इथियोपिया भारतीय गुंतवणूकदारांना तेलबियांच्या कंत्राटी शेतीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विजय दर्डा यांनी ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट अॅण्ड स्ट्रेट थॉट्स’ हे पुस्तक आणि ‘लोकमत समाचार’चा ‘अत्त दीप भवो’ हा दिवाळी अंक शेखावत यांना भेट दिला.