संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:44 PM2018-10-12T22:44:26+5:302018-10-12T22:47:47+5:30
संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभागी झालेले मध्य प्रदेशातील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), आराधना भार्गव, दीपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे परिषद पार पडली. या परिषदेतही संविधानाच्या संरक्षणासाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाचे आवाहन करण्यात आले. यावेळी संविधान यात्रेत सहभागी असलेल्या नेत्यांसह माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, पी.एस. खोब्रागडे, पुंडलिक तिजारे, संजय शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी किशोर पोतनवार यांच्या संविधान पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक विलास भोंगाडे यांनी केले. संचालन त्रिलोक हजारे यांनी केले. जगजितसिंग यांनी स्वागत केले. नरेश वाहाणे यांनी आभार मानले.
सरकार कॉर्पोरेटचे गुलाम
सध्याचे सरकार हे कॉर्पोरेटचे गुलाम झाले आहेत.अदानी-अंबानींच्या हितासाठीच विकासाची धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे सरकारची विकास नितीच चुकीची आहे. तेव्हा हे सरकार सत्तेतून उखडून फेकणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रफुल्ल सामंतारा यांनी सांगितले. तर सध्या देशात समाजा-समाजामध्ये, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणा ऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोप सुनीती यांनी केला.