तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस

By मोरेश्वर मानापुरे | Published: November 16, 2023 09:03 PM2023-11-16T21:03:45+5:302023-11-16T21:04:08+5:30

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७७ व्या  प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

Need to make tax system efficient and transparent with the help of technology - Governor Ramesh Bais | तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस

तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस

नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कर प्रणालीत अधिक सुलभता तसेच  पारदर्शकता आणून करदात्यांमध्ये विश्वास निर्माण करा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. येथील राष्ट्रीय कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या  ७७ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल बैस बोलत होते. मंचावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य रवी अग्रवाल, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी, अपर महानिदेशक मनीषकुमार, अपर महानिदेशक सिद्दरमप्पा कपत्तनवार उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले, जग अत्यंत जवळ येत असून येत्या काळात कर संकलन प्रणाली जागतिक स्तरावरुन संचलित व्हावी याचा विचार होणे गरजेचे आहे. भावी अधिकाऱ्यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करेल. असे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल.  करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा. 

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डेटा संकलन ही महत्वाची जबाबदारी राजस्व विभागावर आहे. यासाठी या विभागाला पारदर्शी भूमिका पार पाडावी लागणार आहे. राष्ट्रीय कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक  प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना यावर्षी ७७ वी तुकडी प्रशिक्षित होत आहे, हे अभिमानास्पद आहे. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पुर्णत्वास नेणार आहोत, असा आशावादही राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.

अकादमीमध्ये स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे ही प्रणाली जगात सर्वोत्कृष्ट असून सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य झाले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य रवी अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. प्रदिप एस यांनी ७७ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीचे प्रोफाईल वाचन केले. प्रधान महासंचालक जयंत दिद्दी यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती हर्षवाणी सिंग यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Need to make tax system efficient and transparent with the help of technology - Governor Ramesh Bais

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.