विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकच जर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 01:09 PM2022-11-15T13:09:17+5:302022-11-15T13:27:49+5:30
नागपूर विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण; शैक्षणिक वर्तुळात खळबळ
नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसुली प्रकरण समोर आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. इतकं घाबरून जाण्यासारखं त्या प्राध्यापकाने असं काय केलं की विभागप्रमुखांना पैसे द्यावे लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कर नाही त्याला डर कशाला, ज्या माणसाने काही केलच नसेल तर घाबरण्याचे कारण काय. त्या उच्चपदस्थ विभागप्रमुखांपैकी एकहीजण पोलीस, भरोसा सेल, महिलांच्या संस्था किंवा राज्य महिला आयोगाकडे का नाही गेले?आपण काहीही केलेलं नाही, आमची फसवणूक होत असल्याबाबत त्यांनी आपली बाजू का नाही मांडली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षण क्षेत्रात जर असे प्रकार घडत असतील, प्राध्यापकच जर असे करायला लागले तर ते अजिबात योग्य नाहीये, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
महिलांच्या संदर्भात प्रत्येक विद्यापीठात विशाखा समिती असण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. या समित्या अधिक कार्यशील असायला हव्यात, त्यात सक्षम लोकं असायला हवीत. तसेच, त्यावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, की जे नेमले जात नाहीत. त्यामुळे गुन्हा जरी घडला तरी, त्याची दखल घेऊन जे अहवाल येऊन जी कारवाई व्हायला पाहिजे तेवढी कारवाई झालेली दिसत नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
या प्रकरणात नक्की काय तपास झाला आहे, कोण जबाबदार आहे, काय प्रकराच्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत याबाबत चौकशी केली जाईल. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला पत्र देऊन लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना बोलावून आढावा आणि अहवाल मागणार, असल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
अखेर धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला
दरम्यान, लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लाखो रुपयांची खंडणी वसुलीचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर विद्यापीठाने अखेर खंडणी वसुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार काढून घेतला. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश बजावले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"