‘नीरधूर’ रोखणार प्रदूषण
By Admin | Published: October 2, 2016 02:44 AM2016-10-02T02:44:51+5:302016-10-02T02:44:51+5:30
उद्योग कारखान्यांसोबतच स्वयंपाकघरातील चूल तसेच ‘स्टोव्ह’मुळे वायू प्रदूषणात भरच पडते. विशेषत: ग्रामीण भागात
नागपूर : उद्योग कारखान्यांसोबतच स्वयंपाकघरातील चूल तसेच ‘स्टोव्ह’मुळे वायू प्रदूषणात भरच पडते. विशेषत: ग्रामीण भागात तर महिलांना स्वयंपाक बनविणे ही एक कसरतच असते. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी कमी इंधनाचा वापर व नियंत्रित वायू उत्सर्जन असलेली चूल तयार करण्याचा संकल्प केला. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर ‘नीरधूर’ ही ‘इको-फ्रेंडली’ चूल करण्यात यश आले आहे.
इंधनाच्या प्रमाणात अर्ध्याहून अधिक घट
पारंपरिक चुलीशी तुलना केली असता ‘नीरधूर’मध्ये अर्ध्याहून कमी इंधन लागते. याची रचना अशी करण्यात आली आहे की जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एमिशन कंबश्चन प्रोसेस’ला अधिक प्रभावी करण्यात आले आहे. इंधन व आगीसोबत प्राणवायुचा जास्तीत जास्त संपर्क होईल, अशी रचना यात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सर्जनाचे प्रमाण अर्ध्याहून कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय मानक ब्यूरोच्या मानकांवर ही चूल खरी उतरत आहे, अशी माहिती अंकित गुप्ता यांनी दिली. ही चूल सुरक्षित असून सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरदेखील नेता येते, असेदेखील त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागासाठी लाभदायक
नागपूर : साधारणत: ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये स्वयंपाकासाठी आजदेखील चुलीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यात इंधन म्हणून लाकूडफाटा, कोळसा, वाळलेले तणस किंवा गोवऱ्या वापरण्यात येतात. संपूर्ण स्वयंपाकासाठी इंधन जास्त लागते. शिवाय यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. या धुरात प्रामुख्याने ‘कार्बन मोनोआॅक्साईड’ तसेच ‘पीएम’चा (पार्टिक्युलेट मटेलिअल) समावेश असतो. हे बारीक कण नाकातोंडावाटे थेट शरीरात जाण्याचा धोका असतो व यामुळे फुफ्फुस तसेच श्वसनसंस्थेशी निगडित आजार होतात. ग्रामीण भागात या आजारांचे प्रमाण जास्त आहे. ‘भारतीय मानक ब्यूरो’तर्फे उत्सर्जनासंदर्भात मानके ठरविण्यात आली आहेत. या मानकांनुसार या चुलींमधून प्रचंड प्रदूषण होते.
त्यामुळे ‘भारतीय मानक ब्यूरो’च्या मानकांवर खरे उतरणारे व कमी इंधनात जास्त ऊर्जा देणारी ‘इको-फ्रेंडली’ चूल बनविणे हे ‘नीरी’च्या वैज्ञानिकांसाठी आव्हानच होते. ‘सीएसआयआर-८००’ या उपक्रमांतर्गत ‘नीरधूर’ ही चूल तयार करण्यात आली. डॉ.नितीन लाभसेटवार व अंकित गुप्ता यांच्या नेतृत्वातील ‘टीम’ने ही चूल तयार केली. या ‘टीम’मधील वैज्ञानिकांत एस.एस.वाघमारे, एम.एन.व्ही.अनिल, संदीप चिदमलवाड, डॉ.साधना रायलू यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)
देशातील सर्वश्रेष्ठ चूल
‘नीरी’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नीरधूर’चे देशात अनेक ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे या चुलीला मान्यता मिळाली आहे. ऊर्जेची क्षमता व उत्सर्जन यांच्या आधारावर ही देशातील सर्वश्रेष्ठ चूल असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. या चुलीसंदर्भात ‘नीरी’ने ‘पेटंट’साठी अर्ज केला आहे. ही प्रणाली जाणून घेण्यासाठी उद्योजक तसेच ‘स्टार्टअप्स’ संपर्क साधू शकतात, असे आवाहन ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी केले आहे. विविध गावांत १०० ‘नीरधूर’ चुलींचे वाटप करण्यात येणार असून तेथील प्रदूषणाचा अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती डॉ. नितीन लाभसेटवार यांनी दिली.