नीरज खटी यांनी नाकारले नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 08:43 PM2019-09-13T20:43:43+5:302019-09-13T20:45:22+5:30
नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर एलआयटीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज खटी यांची निवड करण्यात आली. मात्र धारणाधिकारांची विनंती अमान्य झाल्याने त्यांनी हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याकुलसचिव पदावर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था (एलआयटी) चे रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज खटी यांची निवड करण्यात आली. मात्र धारणाधिकारांची विनंती अमान्य झाल्याने त्यांनी हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालक पदावर औषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल साबळे यांची निवड झाली असून विद्यापीठाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
७ व ८ सप्टेंबर २०१९ रोजी अनुक्रमे कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. कुलसचिव पदासाठी डॉ. नीरज खटी यांची निवड करण्यात आली मात्र त्यांनी या पदावर नियुक्ती आदेशानुसार रुजू होण्यास असमर्थता दर्शविल्याने, कुलसचिव पदासाठी नव्याने जाहिरात निघणार असून लवकरच हे पद भरले जाईल असे पत्रकाद्वारे विद्यापीठाने कळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. नीरज खटी यांनी सद्यस्थितीतील प्राध्यापक पदावरुन धारणाधिकार (लीन) मिळवण्यासाठी तसेच वेतन संरक्षणासाठी विनंती अर्ज दिला. परंतु विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी तांत्रिक कारणांमुळे धारणाधिकार मंजूर करता येत नसल्याचे सांगितले. तसेच वेतन संरक्षण ही बाब विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने डॉ. खटी यांची ही विनंतीही कुलगुरू यांनी अमान्य केली. विनंती अमान्य झाल्याने डॉ. खटी यांनी कुलसचिव पद स्वीकारण्यास नकार दर्शविला. विद्यापीठाचे कुलसचिव पद हे नियमाप्रमाणे पाच वर्षांसाठी भूषवता येते. धारणाधिकार मिळाला असता तर पाच वर्षानंतर डॉ. खटी हे पुन्हा एलआयटीमध्ये पूर्वीच्या प्राध्यापक पदावर रुजू होऊ शकले असते. मात्र ही विनंती अमान्य झाल्याने डॉ.खटी यांनी औटघटिका ठरू पाहणारे कुलसचिव पद नाकारुन प्राध्यापक म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. परिणामी कुलसचिव पदासाठी आता नव्याने जाहिरात दिली जाणार असून पुन्हा मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. दरम्यान परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकपदी डॉ. प्रफुल्ल साबळे यांची निवड झाली असून विद्यापीठाद्वारे नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नियुक्ती आदेशानुसार डॉ.साबळे पद स्वीकारणार आहेत.
दोन्ही पदे विद्यापीठातील वरिष्ठ प्रशासकीय पदे असून त्यावर आपलीच व्यक्ती नियुक्त व्हावी, यासाठी विविध गट सक्रिय झाले होते. कुलसचिव पदासाठी ३२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर अर्जाची छाननी करून २३ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले. यापैकी सातच उमेदवारांनी हजेरी लावली. यात प्रभारी कुलसचिव व ‘एलआयटी’चे प्रोफेसर डॉ.नीरज खटी, विद्वत् परिषदेचे सदस्य डॉ. संजय दुधे, डॉ. चौधरी, डॉ.दोंतुलवार, डॉ.नंदनवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर रविवारी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांच्या निवडीसाठी दहा उमेदवार यासाठी पात्र होते. यात डॉ.बी.आर.महाजन, डॉ.अनिल हिरेखण, डॉ. प्रफुल्ल साबळे, डॉ.एस.व्ही.दडवे, डॉ.ए.जे.लोबो, डॉ.ए.एम.धापडे, डॉ.फुलारी, डॉ.आर.के.ठोंबरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
तो फोन कॉल कुणाचा?
विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मुलाखती घेतल्यानंतर डॉ. नीरज खटी यांची या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ऐनवेळी एक अज्ञात फोन आल्यानंतर त्यांच्या नियुक्तीत अडथळे येत गेल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. यानंतर धारणाधिकार व वेतन संरक्षणाच्या विनंतीबाबत तांत्रिक कारणे पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र डॉ. खटी यांनी अर्ज करताना, मुलाखती घेताना आणि त्यानंतर नियुक्ती जाहीर करताना या तांत्रिक बाबी विद्यापीठाच्या लक्षात का आल्या नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे तो अज्ञात फोन कॉल कुणाचा, ही चर्चा सध्या विद्यापीठ वर्तुळात आहे.