भारीच! 'या' उपकरणाने रस्त्यावर कमी होईल कर्कश हॉर्नचा त्रास

By निशांत वानखेडे | Published: October 4, 2023 05:30 PM2023-10-04T17:30:09+5:302023-10-04T17:32:07+5:30

नीरीने विकसित केले ध्वनी अवरोधक पॅनल : निरुपयोगी टायर व राखेचा वापर

Neeri developed sound insulation panels, This device will reduce the hassle of shrill horns on the road | भारीच! 'या' उपकरणाने रस्त्यावर कमी होईल कर्कश हॉर्नचा त्रास

भारीच! 'या' उपकरणाने रस्त्यावर कमी होईल कर्कश हॉर्नचा त्रास

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : सध्या तुम्ही नागपूरच्या कोणत्याही चौकात गेला तर कर्कश हॉर्नचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जाणवत नसले तरी या ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत. हॉर्न किंवा कोणत्याही प्रकारच्या ध्वनीचा त्रास काही प्रमाणात कमी करणारे एक उपकरण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. हे टाईल्ससारखे दिसणारे पॅनल आहेत, जे काेणत्याही ध्वनीची तीव्रता ५ ते ८ डेसिबलपर्यंत कमी करू शकतात.

नीरीचे संशोधक डॉ. रितेश विजय यांच्या नेतृत्वात विजया लक्ष्मी, चैतन्य ठाकरे, अभिषेक बिसारिया व कोमल कलावापुडी यांनी हे पॅनल विकसित केले आहे. फेकले जाणारे वाहनांचे टायर आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा वापर करून हे पॅनल तयार करण्यात आले असून त्यास ‘अॅको पॅन’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक पॅनल जोडून त्यांना बहुखंडीय फ्रेम असलेल्या चलनशील उपकरणात फिट करायचे. उपकरणाच्या दुसऱ्या बाजुला वनस्पतींचे व्हर्टिकल गार्डन लावले आहे. या वनस्पतीमध्ये सुद्धा ध्वनी शोषूण घेण्याची क्षमता असते. 

या संपूर्ण उपकरणाला ‘कॉम्पॅक्ट ग्रीन नॉईज बॅरिअर’ (सी-नोबार) असे नाव देण्यात आले आहे. हे स्थायी ठेवता येईल किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवितासुद्धा येईल.

कुठे, कसा होईल उपयोग?

- उड्डानपुलाच्या दोन्ही बाजुला ‘सी-नोबार’ पॅनलची चेन लावता येईल.
- कोणतेही रस्ते, महामार्गावर पॅनलची श्रुंखला जोडता येईल. रस्त्याच्या दुभाजकांवरही पॅनल लावणे शक्य. अधिक ध्वनी प्रदूषण होणाऱ्या चौकातही हे लावले जाणे शक्य आहे.

- कोणत्याही कंपनीच्या फेन्सिंगवरही पॅनल लावता येतात.
- इनडोअर, घरातील खोल्यांचे दुभाजक आणि एन्क्लोजरमध्येही सी-नोबारचा उपयोग करून ध्वनी कमी करणे शक्य आहे.

- आतापर्यंत व्हर्टिकल गार्डन सफल होत नव्हते. या शोधात गुरुत्वाकर्षण आधारित सिंचन प्रणाली तयार करून गार्डन तयार केले आहे.

पेटेन्ट मिळाले, लवकरच उपयोगात

एको-पॅनला २०२१ मध्ये पेटेन्ट मिळाले आहे. त्यानंतर संपूर्ण सी-नोबारला यंदा पेटेंट देण्यात आले आहे. सध्या विविध कंपन्यांशी चर्चा सुरू असून लवकरच त्यांचा व्यापक स्तरावर उत्पादन आणि उपयोग होणे शक्य होईल, अशी माहिती डॉ. रितेश विजय यांनी दिली.

आतापर्यंत उपयोगात येणारे ध्वनी रोधक हे परावर्तक आहेत, ज्यावर धडक देऊन ध्वनी परत येतो. मात्र सी-नोबार हे ध्वनी शोषूण घेणारे उपकरण आहे. यामुळे विद्युत केंद्राची राख आणि मोठ्या प्रमाणात निघणारा टायरचा कचरासुद्धा कमी करता येईल. यात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता आणखी कमी करण्यास संशोधनाला वाव आहे.

- डॉ. रितेश विजय, वैज्ञानिक, ध्वनी प्रदूषण नियंत्रण विभाग, नीरी.

Web Title: Neeri developed sound insulation panels, This device will reduce the hassle of shrill horns on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.