नीरी म्हणजे संपन्न जैवविविधतेचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:39 AM2021-02-20T10:39:38+5:302021-02-20T10:40:05+5:30
Nagpur News तज्ज्ञांच्या मते नीरीच्या आतील जंगल म्हणजे समृद्ध जैवविविधतेचे घरच आहे आणि त्याचे संवर्धन हाेणे नितांत गरजेचे आहे.
श्रेयस हाेले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी)ची जागा घेतली जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाेर देऊन स्पष्ट केले. यामुळे पर्यावरणवाद्यांनी समाधानाचा सुस्कारा साेडला. तज्ज्ञांच्या मते नीरीच्या आतील जंगल म्हणजे समृद्ध जैवविविधतेचे घरच आहे आणि त्याचे संवर्धन हाेणे नितांत गरजेचे आहे.
नीरीच्या जंगलात लुप्त हाेत असलेल्या दुर्मीळ मांजराचे अस्तित्व आढळून आल्याचे निरीक्षण काही तज्ज्ञांनी नाेंदविले आहे. मांजराची ही प्रजाती केवळ आशिया व आफ्रिकेच्या भागात आढळून येते. या मांजराचे अस्तित्व धाेकादायक स्थितीत पाेहोचले आहे. भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा-१९७२च्या शेड्यूल २ मध्ये या प्राण्याचा समावेश हाेताे. अशा दुर्मीळ प्रजातींच्या अस्तित्वाने पर्यावरण अभ्यासकांसाठी नीरीचे जंगल कायम कुतूहलाचा विषय ठरले आहे. एका माहितीनुसार काही वर्षांपूर्वी वनविभागाच्या पथकाने झाडांच्या अभ्यासासाठी नीरीच्या आतमध्ये सर्वेक्षण केले हाेते. त्यांच्या निरीक्षणानुसार नीरी परिसरात चंदन, विविध प्रजातीचे आंबे, निंबाची झाडे आणि अनेक दुर्मीळ प्रजातीच्या वनस्पती आढळतात. याशिवाय काही औषधी वनस्पतींचेही अस्तित्व येथे आहे.
केवळ वनस्पती नाही तर विविध प्रजातीचे पाेपट, माेर, सुतार, घुबड अशा विविध पक्ष्यांच्या प्रजातीचे वास्तव्य येथे आहे. मुंगुस व कासव या सामान्य प्रजातीच्या प्राण्यांचे वास्तव्य येथे आहे. नीरीचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहेच, मात्र प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही संस्था अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निसर्गाचे, पर्यावरणाचे साैंदर्य वाढविणाऱ्या या परिसराचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याची भावना पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली.