‘नीरी’ स्थापन करणार देशातील पहिले ‘कार्बन कॅप्चर युटिलायझेशन’ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:00 AM2022-01-13T07:00:00+5:302022-01-13T07:00:12+5:30
Nagpur News वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने नीरीतर्फे देशातील पहिल्या ‘सीसीसीयूएस’ केंद्राची (कार्बन कॅप्चर युटिलायझेशन ॲन्ड सिक्वेस्टेशन) स्थापना करण्यात येणार आहे.
स्नेहलता श्रीवास्तव
नागपूर : वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने नीरीतर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत. यातील एक पाऊल संस्थेने टाकले असून, देशातील पहिल्या ‘सीसीसीयूएस’ केंद्राची (कार्बन कॅप्चर युटिलायझेशन ॲन्ड सिक्वेस्टेशन) स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी ९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ‘सीएसआयआर’तर्फे याला पूर्ण अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून विविध स्रोतांकडून कार्बन डायऑक्साईड टिपणे, इतर ठिकाणी त्याचा योग्य वापर करणे आणि शेवटी उरलेला कार्बन डायऑक्साईड समुद्र किंवा जमिनीखाली सोडणे, या प्रक्रिया करण्यात येणार आहेत. २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन ३० टक्के व २०७० पर्यंत शून्य टक्के करण्याचा मानस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो येथील परिषदेत व्यक्त केला होता व संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या परिषदेत पाचसूत्री मंत्र दिला होता. त्यादृष्टीनेच हा पुढाकार घेण्यात आला आहे.
‘सीसीसीयूएस’ हा सीएसआयआर प्रयोगशाळांचा सुविधा निर्माण प्रकल्प असेल. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील ३८ सीएसआयआर प्रयोगशाळांच्या नेटवर्कमधील १३ प्रयोगशाळा कार्बन कॅप्चर, वापर आणि जप्तीसाठी काम करतील. या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, स्केलिंग आणि उपयोजित करण्यावर भर देण्यात येईल.
सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मार्गदर्शन आणि पाठबळ देणारे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत, अशी माहिती नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी दिली. १३ प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड तयार करणाऱ्या उद्योगांसाठी क्षेत्रनिहाय तंत्रज्ञान पॅकेजेस अगोदरपासूनच तयार आहेत, असे सीटीएमडीचे वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ अमित बन्सिवाल यांनी स्पष्ट केले.
हब-स्पोक मॉडेलवर आधारित प्रकल्प
औष्णिक ऊर्जा, पोलाद, ॲल्युमिनियम उद्योग, पेट्रोकेमिकल्स यांच्यासह औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन क्षेत्रानुसार कमी करण्यासाठी या १३ प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. हा प्रकल्प हब आणि स्पोक मॉडेलवर आधारित आहे. नीरी हब म्हणून तर १३ प्रयोगशाळा स्पोक म्हणून कार्य करतील. नीरीने या प्रकल्पासाठी स्वतंत्र इमारत बांधणे, पायाभूत सुविधांचा विकास व केंद्रासाठी उपकरणे घेण्यासाठी ९५ कोटी मंजूर केले आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. राजेश बिनीवाले यांनी दिली.