नीटचा गाेंधळ कायम, सरकारी मेडिकल काॅलेजचा मार्ग ६३० च्या खालील विद्यार्थ्यांसाठी कठीण

By निशांत वानखेडे | Published: June 10, 2024 04:42 PM2024-06-10T16:42:55+5:302024-06-10T16:43:29+5:30

नीटच्या निकालाविराेधात विद्यार्थी व पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

NEET issue, Govt medical college tough for students below 630 | नीटचा गाेंधळ कायम, सरकारी मेडिकल काॅलेजचा मार्ग ६३० च्या खालील विद्यार्थ्यांसाठी कठीण

नीटचा गाेंधळ कायम, सरकारी मेडिकल काॅलेजचा मार्ग ६३० च्या खालील विद्यार्थ्यांसाठी कठीण

नागपूर : नीट निकालावरून देशभरात सध्या गाेंधळ सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी प्रवेश प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. अशात विद्यार्थ्यांवर दडपण वाढले आहे. भरघाेष निकाल लागल्याने ६३० च्या खाली गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग कठीण जाणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा करून ६०० च्या आसपास गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना निराशा येण्याची भीती आहे.

नीटच्या निकालाविराेधात विद्यार्थी व पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ६७ विद्यार्थ्यांना पहिली रॅंक मिळणे, एकाच केंद्रावरील ६ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळणे आणि एनटीए’द्वारे १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणे वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहे. हे प्रकरण निस्तरल्यानंतर प्रवेशाचा प्रश्न निर्माण हाेण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
देशभरात एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमाच्या ४५ हजार जागा आहेत. गेल्या वर्षी ५८७ ते ५८० गुणांपर्यंत या जागा भरल्या गेल्या हाेत्या. यंदा भरघाेष गुण मिळाल्याने कट ऑफ पाॅइंट ३० ते ४० गुणांनी वर जाण्याची, म्हणजे ६३० गुणांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ६२० पर्यंत गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ५० हजाराच्या वरची ऑल इंडिया रॅंक मिळाली आहे. विशेष म्हणजे ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाईल असल्याने दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये ७२० च्या खालील ग्रेस गुणांमुळे ७१९ गुण घेणाऱ्यांनाही प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे एम्समध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा हाेऊ शकते. नागपूरचा वेद शेंडे, शुभान सेनगुप्ता हे विद्यार्थी यात पात्र ठरतील, हे विशेष. आता निकालाचा गाेंधळ दूर हाेण्याची व प्रवेश प्रक्रिया सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्रात स्थिती चांगली

महाराष्ट्रात ३८ वैद्यकीय महाविद्यालये आहेत व त्यात ५१०० जागा आहेत. खाजगी महाविद्यालयात ९००० च्यावर जागा आहेत. सरकारी महाविद्यालयातील ८५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारी महाविद्यालयाचे प्रवेश कमी कटऑफवरही हाेण्याची शक्यता आहे. विशेषत: आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकताे. कमी वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या बिहारसारख्या राज्यात प्रवेशाची मारामारी हाेण्याची शक्यता नीट समुपदेशक आर्यन नायडू यांनी व्यक्त केली. शिवाय महाराष्ट्रात नीट परीक्षेदरम्यान गाेंधळाची घटना नसल्याने येथील विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळाला नाही.

Web Title: NEET issue, Govt medical college tough for students below 630

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.