‘नीट’चा महाघाेळ : पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले गुण , यवतमाळच्या भूमिकाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:06 AM2024-07-17T04:06:32+5:302024-07-17T04:06:54+5:30
दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण ६४० वरून थेट १७२ वर खाली आले आणि ११ हजाराच्या रँकवरून ती थेट ११,१५,८४५ व्या रँकवर फेकली गेली.
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) राबविलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेचा सावळागाेंधळ संपण्याची चिन्हे नाहीत. या महाघाेटाळ्याचा माेठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला बसला आहे. या मुलीला पहिल्या परीक्षेत ६४० गुण मिळाले हाेते व ऑल इंडिया रँक ११,७६९ हाेती. मात्र, दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण ६४० वरून थेट १७२ वर खाली आले आणि ११ हजाराच्या रँकवरून ती थेट ११,१५,८४५ व्या रँकवर फेकली गेली.
भूमिका राजेंद्र डांगे असे तिचे नाव असून ती आर्णी येथील रहिवासी आहे. एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या १५०० विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नाही. तिने परीक्षाही दिली नाही. पुन:परीक्षेच्या निकालानंतर गुणपत्रिका बदलून मिळाली.
मुलीचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न भंगले
नव्याने गुणपत्रिका आली तेव्हा आम्हांला माेठा धक्का बसला. माझ्या मुलीचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न भंगले. याबाबत आम्ही एनटीएला ई-मेलही पाठविला; पण त्याचे प्रत्युत्तर आले नाही. काय करावे कळेना झाले आहे.
- राजेंद्र डांगे, भूमिकाचे वडील