नागपुरातील आमदार निवासात निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:39 PM2020-04-27T21:39:47+5:302020-04-27T21:41:32+5:30
आमदार निवास येथील निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका असल्याची शंका वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अगोदर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. यासाठी शहरात विविध क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आली आहेत. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यांनाच रुग्णालयात भरतीसाठी पाठवले जाते. ही प्रक्रिया अतिशय चांगली असली तरी योग्य काळजी घेतली गेली नाही तर संसर्ग होण्याची शक्यता बळावते. आमदार निवास येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका असल्याची शंका वर्तविली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यातच क्वारंटाईन सेंटरचाही समावेश आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच अगोदर क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. शहरात असे अनेक सेंटर आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे क्वॉरंटाईन सेंटर म्हणजे आमदार निवास होय. आमदार निवासाची इमारत ही क्वारंटाईन सेंटरसाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येकाला स्वतंत्र व विस्तीर्ण खोली आहे. खोलीमध्येच बाथरूम व शौचालयाची व्यवस्था आहे. प्रत्येक खोलीला गॅलरी आहे. त्यामुळे व्यक्ती एकटा असेल तरी तो खोलीतच फिरू शकतो, अशी व्यवस्था आहे. परंतु क्वारंटाईन असलेला व्यक्ती हा कोरोना संशयित आहे, ही बाबही विसरून चालणार नाही. त्यामुळे ही पायाभूत व्यवस्था चांगली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यायची त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ येथे आणलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केलेले आहे म्हणजेच त्यांना इतरांपासून स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. १४ दिवस कुणासोबतच संपर्क येऊ द्यायचा नाही. परंतु येथील काही संशयित एकमेकांच्या खोलीत सर्रासपणे जातात. चर्चा करत बसतात. जेवण करतात. काही लोकांना त्यांच्या घरून जेवण उपलब्ध करून दिले जाते. जेवण वाचल्यावर तो डबा परत घरी जातो. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर १४ दिवसांनंतर ज्या रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले त्याला मेयो-मेडिकलमध्ये पाठवले जाते. त्यानंतर ती खोली (सॅनिटाईझ) निर्जंतुकीकरण न करताच दुसऱ्याला अलॉट केली जात असल्याचेही प्रकार होत असल्याचे सांगितले जाते.
आमदार निवास हे कोरोना क्वारंटाईन सेंटरमधील सर्वात महत्वाचे केंद्र आहे. येथे असे प्रकार होत असतील तर निश्चितच आमदार निवासात येणारा निगेटिव्ह व्यक्तीही पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना पत्र पाठवून आमदार निवास क्वारंटाईन सेंटरमधील समस्यांकडे लक्ष वेधले असून यावर उपाय योजण्याची विनंती केली आहे.