रुग्णालयाचे मेंटेनन्सकडेच दुर्लक्ष, चौकशी समितीचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:38+5:302021-01-21T04:08:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग ही शॉर्टसर्किटमुळेच लागली असून रुग्णालयातील वायरिंगसह एकूणच विजेच्या मेंटेनन्सकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग ही शॉर्टसर्किटमुळेच लागली असून रुग्णालयातील वायरिंगसह एकूणच विजेच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे अग्निकांड घडले असल्याचा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. एकूणच रुग्णालयातील विजेचे मेंटेनन्स सांभाळणाऱ्या एजन्सीवर या घटनेचा ठपका ठेवल्याचे सांगितले जाते.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी रोजी घडलेल्या अग्निकांडात ९ चिमुकल्यांचा जीव गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. तब्बल ११ दिवसांनंतर समितीने अहवाल सादर केला. मिळालेल्या माहितीनुसार चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात विजेच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवला आहे. बेबी वॉर्मरच्या कंट्रोल युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाले. या ठिकाणी विजेच्या संदर्भात जी काळजी घ्यायला हवी असते ती घेण्यात आली नाही. याच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करण्यात आले. रुग्णालयाचे केवळ विजेच्यासंदर्भातच नव्हे तर रुग्णालयातील एकूणच मेंटेनन्सकडे दुर्लक्ष असल्याचेही अहवालात म्हटले आहे. काही जणांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपकासुद्धा अहवालात ठेवण्यात आल्याचे सांंगितले जाते.
बॉक्स
डॉक्टर, परिचारिकांनाही प्रशिक्षणाची गरज
चौकशी अहवालात काही उपाययोजनाही सूचवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, रुग्णालयात नेमक्या आगी कशा लागतात आणि त्यापासून कसा बचाव करावा, याचे परिपूर्ण प्रशिक्षण डॉक्टर, परिचारिकांनाही मिळावे, अशी सूचनाही चौकशी समितीने अहवालात केली असल्याचे सांगितले जाते.