प्रतिभावंतांना नाकारणारा समाज मूल्यहीन

By Admin | Published: December 1, 2014 12:49 AM2014-12-01T00:49:40+5:302014-12-01T00:49:40+5:30

श्रम व प्रतिभेला प्रतिष्ठा नाकारणारा समाज मूल्यहीन असतो, असे परखड मत कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

The neglected society is worthless | प्रतिभावंतांना नाकारणारा समाज मूल्यहीन

प्रतिभावंतांना नाकारणारा समाज मूल्यहीन

Next

वेदप्रकाश मिश्रा : सनराईज पीस मिशनचे पुरस्कार वितरित
नागपूर : श्रम व प्रतिभेला प्रतिष्ठा नाकारणारा समाज मूल्यहीन असतो, असे परखड मत कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
सनराईज पीस मिशनच्या विविध पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी खासदार गेव्ह आवारी अध्यक्षस्थानी, तर व्यासपीठावर भाजप नेते जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम श्रद्धानंदपेठेतील मुंडले प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात पार पडला.
समाजाचा अंतरात्मा जिवंत ठेवायचा असेल तर, गुणवंतांचा सत्कार करणे आवश्यक आहे. समाज बाजारवादावर कधीच चालत नाही. उन्नत समाज घडविण्यासाठी मूल्य जतन झाले पाहिजे. दुर्दैवाने समाजात प्रतिभेला डावलून पदाचा सत्कार केला जात आहे. समाजात भरपूर प्रतिभा आहे, पण तिला संधी मिळत नाही, असे मिश्रा यांनी सांगितले.
तिवारी यांनी माणुसकी नसलेली व्यक्ती सत्कारास अयोग्य असल्याचे नमूद केले. देशात विध्वंसक कारवाया करणारे दहशतवादी उच्चशिक्षित असतात. यावरून व्यक्ती शिक्षणाने नाही तर संस्काराने मोठी होते हे सिद्ध होते. परिणामी पाठ्यपुस्तकांतून महापुरुषांचे जीवनचरित्र काढून टाकण्याचा विचारही व्हायला नको, असे ते म्हणाले. भारताने इतर देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती केली आहे. भविष्यात हा देश नक्कीच सुपर पॉवर होईल. भारतीय व्यवस्था आध्यात्मिक मूल्यांवर आधारित आहे. यामुळे देशातील नागरिकांचा शांततेवर विश्वास आहे, असे आवारी यांनी सांगितले, तर गुप्ता यांनी अधिकार व पैशांच्या बळावर पुढे जाण्याच्या विचारसरणीमुळे खरी प्रतिभा वर येत नसल्याची खंत व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हरगोविंद मुरारका यांनी प्रास्ताविक, तर उमाशंकर अग्रवाल व हरीश गुप्ता यांनी संचालन केले. हरीश गुप्ता यांनी आभारही मानले. डॉ. जीवेश पंचभाई, डॉ. राजेश नायक, गोपाल लद्धड, राजेश धरमठोक, विवेक मुरारका आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.(प्रतिनिधी)

Web Title: The neglected society is worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.