समाजातील दुर्लक्षित विषय पडद्यावर येणे आवश्यक : मधुर भंडारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:31 PM2020-02-06T22:31:28+5:302020-02-06T22:34:30+5:30
सिनेमामधूनच लोकांना अनेक मूल्यात्मक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे दुर्लक्षित गोष्टी सिनेमामधून हाताळण्याचा, मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मधुर भंडारकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असे म्हणतात, मात्र बहुतेक वेळा वर्तमानपत्रामधून, वृत्तवाहिन्यांवरून वाचायला, ऐकायला येणाऱ्या समाजातील घटना, घडामोडी सिनेमा माध्यमातूनही दुर्लक्षित राहतात. सिनेमामधूनच लोकांना अनेक मूल्यात्मक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे अशा दुर्लक्षित गोष्टी सिनेमामधून हाताळण्याचा, मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मधुर भंडारकर यांनी व्यक्त केले.
ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यावतीने तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, विदर्भ साहित्य संघ, सप्तक आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या सहकार्याने चौथ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे गुरुवारी वनामती येथील सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी भंडारकर बोलत होते. याप्रसंगी महापौर संदीप जोशी, भारताचे अॅनिमेशन गुरु म्हणून प्रसिद्ध आशिष कुळकर्णी, महोत्सवाचे संयोजक व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, आयोजन समितीचे सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मनपाचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, हेडी मेरी, ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सुप्रान सेन आदी मान्यवर उपस्थित होते. भंडारकर पुढे म्हणाले, आशयप्रधान चित्रपट बघताना केवळ निराशा मिळण्यापेक्षा प्रेक्षकांना आनंदही मिळणे आवश्यक आहे. चित्रपट महोत्सवामुळे वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट पाहण्याची व विविध लोकांना भेटण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय छोट्या बजेटमध्ये चित्रपट निर्मितीचे तंत्र शिकायला मिळत असल्याचेही ते म्हणाले.
आशिष कुळकर्णी यांनी अॅनिमेशन या क्षेत्राविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. अनेकांना हे तंत्र सोपे वाटते, मात्र चित्रपटाच्या ज्या सिनला १० दिवस लागतात तेच काम अॅनिमेशन करताना ६ महिने लागत असल्याचे ते म्हणाले. कठीण असले तरी समाधान देणारे आहे, ही भावनाही त्यांनी व्यक्त केली. भारतात अद्यापही अॅनिमेशन हे क्षेत्र मुलांपुरते मर्यादित मानले जाते. अमेरिकेतही अॅनिमेशनला कौटुंबिक मनोरंजनाची मान्यता मिळायला ७० वर्षे लागली. त्यामुळे भारताबाबत आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले. भारतात कथांची कमतरता नाही. त्यामुळे ५००० वर्षापासून समाजाच्या भावनांशी जुळलेल्या कथांवर लक्ष केंद्रित करून अॅनिमेशनला चालना देण्याचा प्रयत्न असल्याची भावना आशिष कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
संदीप जोशी यांनी, हा महोत्सव पुढेही असाच चालत राहील आणि मनपा सर्व सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. जब्बार पटेल यांनी पुणे फेस्टिव्हलच्या अनुभवातून नागपूर फेस्टिव्हलचे महत्त्व सांगितले. अनेक देशांचे, अनेक भाषांचे हे चित्रपट रसिकांसाठी मेजवानी असल्याचे ते म्हणाले. जगभरातील लोकप्रिय चित्रपट महोत्सवाची जबाबदारी त्या शहराच्या महापालिकेने सांभाळली आहे, त्याप्रमाणे नागपूर महापालिकेनेही ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मेश्राम यांनी केले. यावेळी मधुर भंडारकर यांना ऑरेंज सिटी फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड आणि आशिष कुळकर्णी यांना ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयोजनात उदय गुप्त, अशोक कोल्हटकर आदींचा सहभाग होता.
युक्रेनच्या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात
हा महोत्सव ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गुरुवारी उद्घाटनानंतर युक्रेन, रशिया येथील अलेक्झांडर झोना यांना दिग्दर्शित केलेल्या ‘लिझाज टेल’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवार ७ फेब्रुवारीला आयनॉक्स जसवंत मॉल येथे विविध देशातील ५ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये स्पेनचा ‘विरिडियाना’, चीनचा झँग वेई दिग्दर्शित ‘दि फोटोग्राफर’, युनायटेड किंगडम येथील डेव्हीड शुलमन यांनी दिग्दर्शित केलेला ‘दि बास्केट : रेज टू रिचेस’, ब्राझीलचा व्हॅगनर मौरा दिग्दर्शित ‘मारिझेला’ आणि शेवटी हंगेरी येथील अट्टिला यांचे दिग्दर्शन असलेल ‘टॉल टेल्स’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. सिनेरसिकांनी या चित्रपटांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. जब्बार पटेल यांनी केले.