अंबाझरी तलाव बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:46+5:302020-12-11T12:20:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता ...

Negligence regarding safety of Ambazari Lake Dam | अंबाझरी तलाव बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा

अंबाझरी तलाव बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करण्यात आली आहे. ढासळण्याच्या स्थितीत पोहोचलेल्या अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असा आदेश समितीला देण्यात आला आहे. प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान मनपाच्या उदासीन व हलगर्जीपणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी प्राधिकरणाचे सदस्य बॅ. विनोद तिवारी, एस.डी. कुलकर्णी व एस.टी. सांगळे यांनी हा निर्णय सुनावला. १८७० मध्ये तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावाचे पाणी ‘लिक’ होत असल्याबाबत जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी ‘सोशल मीडिया’वर अनेक छायाचित्रांसह लेख ‘पोस्ट’ केला होता. यावर प्राधिकरणाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली होती. मनपासमवेत सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली होती. ७ डिसेंबर रोजी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रावर आपत्ती दर्शविली होती. प्राधिकरणाला या प्रकरणात स्वत: दखल घेण्याचा अधिकार नाही, असेदेखील म्हटले होते. प्राधिकरणाने मनपाच्या हरकतींचे खंडन करीत प्रकरणाची सुनावणी केली व १० डिसेंबर रोजी निर्णय सुनावला. बंधाऱ्याची सुरक्षा व अतिक्रमणासंदर्भात अहवाल तयार करण्याचा निर्णयात आदेश देण्यात आला. समितीला प्रत्येक महिन्यात समीक्षा बैठक घेण्यास सांगण्यात आले आहे. पहिली बैठक २० डिसेंबर रोजी बोलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

...तर नागपूर बुडेल

अंबाझरी तलाव खूप जुना आहे. मनपाने या तलावाच्या सुरक्षेसंदर्भात सुरुवातीपासूनच उदासीनता दाखविली. १९९३ साली अखेरची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर तलावाची उपेक्षा होत आहे. काळानुरूप बंधारा कमकुवत होत आहे. जर वेळेत तलावाच्या बंधाऱ्याची डागडुजी झाली नाही तर हा बंधारा ढासळू शकतो. जर असे झाले तर नागपुरातील अनेक वस्त्या बुडतील.

या होत्या मागण्या

- अंबाझरी तलावाचा बंधारा व ‘स्पील वे’ची तातडीने डागडुजी व्हावी.

- तलावाच्या जवळपास मातीच्या बंधाऱ्याची डागडुजी व्हावी.

- तलाव परिसरात लावलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला दुसरीकडे स्थानांतरित करावे.

- तलावाच्या सभोवताल असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे.

- तलावात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यात यावे.

- ‘एमआयडीसी’च्या उद्योगांमधून निघणाऱ्या घाणेरड्या पाण्याचा निचरा थांबावा.

प्रगतीचा वेग वाढेल, संकट टळेल

‘लोकमत’ने या मुद्याला प्रामुख्याने समोर आणले होते, सोबतच नागरिकांचेदेखील लक्ष आकर्षित केले होते. प्राधिकरणाने ‘लोकमत’च्या वृत्तांचीदेखील दखल घेतली. यामुळे नागपूरची वेगाने प्रगती होईल व शहरावरील संकटदेखील दूर होईल, असे महाजन यांनी सांगितले.

Web Title: Negligence regarding safety of Ambazari Lake Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.