वाटाघाटी फिस्कटल्या; मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:14 PM2019-02-28T23:14:06+5:302019-02-28T23:15:15+5:30

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने महापालिकेचे कर्मचारी आज शुक्रवारी मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे. सुमारे २०० कर्मचाऱ्यांसह आंदोलनात महिला कर्मचारीसुद्धा केस अर्पण करणार आहेत.

Negotiations grow; Munda movement on Friday fro the employees | वाटाघाटी फिस्कटल्या; मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी मुंडण आंदोलन

वाटाघाटी फिस्कटल्या; मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी मुंडण आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने महापालिकेचे कर्मचारी आज शुक्रवारी मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे. सुमारे २०० कर्मचाऱ्यांसह आंदोलनात महिला कर्मचारीसुद्धा केस अर्पण करणार आहेत.
सहाव्या वेतन आयोगाची ५९ महिन्यांची थकबाकी, ८४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा याकरिता महापालिका कर्मचाऱ्यांची समन्वय समिती आंदोलन करीत आहे. मुंडण आंदोलनाची घोषणा यापूर्वीही केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मागण्या सोडविण्याची ग्वाही दिली होती. त्यांनी लेखी पत्रही संघटनेला दिले. त्यामुळे मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. १९ फेब्रुवारीला महापालिका मुख्यालयात आयुक्त, भाजपचे पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. मात्र यात कुठलाही तोगडा निघाला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला मुंडण आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आयुक्तांनी गुरुवारी बैठक बोलावल्याने आंदोलन पुन्हा पुढे ढकलण्यात आले होते. या बैठकीतही आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात येणार आहे.
बैठकीस शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्यासह गौतम गेडाम, देवराव मांडवकर आदी उपस्थित होते.
महिलाही कापणार केस
संविधान चौकात मोठ्या प्रमाणात मुंडण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचारी अध्यापक भवन येथे सकाळी ९ वाजतापासून तर इतर कर्मचारी त्यांच्या कार्यालयात मुंडण करतील. संविधान चौकात दुपारी १२ वाजता दहा कर्मचारी मुंडण करणार आहेत. यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश राहील.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
आंदोलन चिरडण्यासाठी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेवर अनुपस्थितीची नोंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनी याचा लेखी खुलासा आधीच केला आहे. हा विषय संपला असताना आंदोलनात सहभागी होऊ नये याकरिता नोटीस बजावून अप्रत्यक्षपणे शिक्षकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केला.

Web Title: Negotiations grow; Munda movement on Friday fro the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.