नेहरु, गांधी घराणेच ओबीसी विरोधी : डॉ. आशिष देशमुख
By दयानंद पाईकराव | Published: February 8, 2024 08:08 PM2024-02-08T20:08:32+5:302024-02-08T20:09:31+5:30
राहुल गांधींच्या मोदींविरोधातील वक्तव्याविरुद्ध भाजपाचे आज आंदोलन
नागपूर : राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी मंडळ कमिशनला विरोध केला. पंडित नेहरुंनीही कालेलकर आयोग लागू केला असता तर ओबीसींच्या चार पिढ्या बर्बाद झाल्या नसत्या. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी असल्याचे सर्वश्रुत असताना राहुल गांधी त्यांच्याविरुद्ध वक्तव्य करीत असून नेहरु, गांधी घराणेच ओबीसी विरोधी आहेत.
राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी सकाळी १० वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात नाराजीचा सूर उमटत असून शुक्रवारी सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि शनिवारी १० फेब्रुवारीला तालुकास्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार कृष्णा खोपडे, भाजपच्या महामंत्री अर्चना डेहनकर, माजी आमदार तथा भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपाचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आदी उपस्थित होते.