नेहरू मैदानाचा वापर स्वयंपाकासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:09+5:302021-02-05T04:38:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरातील नेहरू मैदानाचा वापर क्रिकेटसह अन्य खेळ खेळण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व सभांच्या आयाेजनासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील नेहरू मैदानाचा वापर क्रिकेटसह अन्य खेळ खेळण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व सभांच्या आयाेजनासाठी केला जातो. मात्र, काही दिवसांपासून याच मैदानाचा वापर बाहेरगावांहून येणारी मंडळी स्वयंपाक करण्यासाठी करीत आहेत. या मैदानात असलेल्या हनुमान मंदिराजवळ काही मंडळी साेमवारी (दि. १) दुपारी स्वयंपाक अर्थात मांसाहार शिजवित असल्याने वादाला ताेंड फुटले आणि दाेन गटात हाणामारी झाली. त्यामुळे प्रकरण पाेलिसात पाेहाेचले.
रामटेक शहरातील धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभल्याने विदर्भातील नागरिक या ठिकाणी अस्थी विसर्जन, दशक्रिया व पिंडदान करण्यासाठी येतात. हा कार्यक्रम शहरातील अंबाळा तलावाच्या काठी पार पाडला जाताे. या कार्यक्रमात कावळ्याला विशेष महत्त्व असल्याने तसेच अलीकडच्या काळात अंबाळा तलाव परिसरात एकाही कावळ्याचे वास्तव्य नसल्याने ही मंडळी कावळ्यांच्या शाेधात असतात. शहरातील नेहरू मैदान परिसरात असलेल्या राष्ट्रीय आदर्श विद्यालयाजवळील झाडावर कावळ्यांचे माेठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने ही मंडळी नेहरू मैदानावर येऊन स्वयंपाक करतात आणि कावळ्यांना घास खाऊ घालतात.
या मैदानावर आठवड्यातून किमान तीन ते चारदा स्वयंपाक केला जाताे. साेमवारी नागपूर व कामठी शहरातून प्रत्येकी एक कुटुंब दशक्रिया करण्यासाठी रामटेक शहरात आले. अंबाळा तलाव परिसरातील कार्यक्रम आटाेपल्यानंतर दाेन्ही कुटुंबातील सदस्यांनी नेहरू मैदानावर स्वयंपाक करायला सुरुवात केली. यात एका कुटुंबाचे जेवण आटाेपले हाेते, तर दुसऱ्या कुटुंबाचा स्वयंपाक सुरू हाेता. त्या ठिकाणी चिकन शिजवले जात असल्याचा आराेप करण्यात आल्याने दाेन्ही कुटुंबांमध्ये भांडणाला सुरुवात झाली.
काहींनी गरम विटा तर काहींनी गुप्तीने एकमेकांवर हल्ला चढविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यामुळे अनर्थ टळला. पाेलिसांनी दाेन्ही कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वाहनांसह ताब्यात घेत पाेलीस ठाण्यात नेले. वृत्त लिहिस्ताे या प्रकरणाची चाैकशी सुरू हाेती. दुसरीकडे, नगर परिषद प्रशासनाने या मैदानावर कुणालाही स्वयंपाक करू देऊ नये, केल्यास कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.