नेहरूनगरवासी गडरलाईनच्या दुर्गंधीमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:07 AM2021-03-14T04:07:15+5:302021-03-14T04:07:15+5:30

पावसाळ्यात साचते पाणी : स्ट्रीट लाईटअभावी अंधार, रस्त्यावर बांधकामाचे साहित्य नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळत ...

Nehru Nagar residents suffer from the stench of Gadarline | नेहरूनगरवासी गडरलाईनच्या दुर्गंधीमुळे त्रस्त

नेहरूनगरवासी गडरलाईनच्या दुर्गंधीमुळे त्रस्त

Next

पावसाळ्यात साचते पाणी : स्ट्रीट लाईटअभावी अंधार, रस्त्यावर बांधकामाचे साहित्य

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळत आहेत. शहरात मेट्रो रेल्वे धावत आहे; परंतु न्यू नेहरूनगर येथील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी लढा द्यावा लागत आहे. येथील नागरिक गडरलाईनची समस्या, स्ट्रीट लाईट, अरुंद रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

अपार्टमेंटमधील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

न्यू नेहरूनगरला लागूनच सत्यम प्लाझा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये घाण पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या; परंतु काहीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अपार्टमेंटच्या बाजूला दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपार्टमेंटमधील घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गडरलाईन नेहमी तुंबते

न्यू नेहरूनगर येथील गडरलाईन नेहमीच तुंबते. त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहते. नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेक नागरिकांनी गडरलाईनवर घरे बांधली आहेत. त्यामुळे गडरलाईनची दुरुस्ती करण्यासाठी जागा नसते. रस्त्यावर असलेल्या गडरलाईनला झाकणे नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात झाकणे नसल्यामुळे गडरलाईनमध्ये पाणी शिरते. त्यात लहान मुले पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गडरलाईनला झाकणे बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तसेच गडरलाईन अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात वस्तीत पाणी साचते. हे पाणी साचून राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण होते. त्यामुळे गडरलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

स्ट्रीट लाईटचा अभाव, रस्त्यावर बांधकामाचे साहित्य

न्यू नेहरूनगर परिसरात विजेच्या खांबावर पथदिवे नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर अंधार पसरलेला असतो. नागरिकांना अंधारातून चालत जावे लागते. या भागात अनेक नागरिकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकलेले आहे. रस्ता आधीच अरुंद असल्यामुळे रहदारीस रस्ता उरत नाही. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अपार्टमेंटमधील घाण पाण्याची विल्हेवाट लावावी

सत्यम प्लाझा अपार्टमेंट येथील घाण पाण्यामुळे वस्तीत दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या घाण पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

- सचिन चिमणकर

गडरलाईनची दुरुस्ती करावी

गडरलाईन नेहमीच चोक होते़; त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी साचते. नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गडरलाईन दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा.

- शिवदास लांडगे

पथदिव्यांची व्यवस्था करावी

पथदिवे नसल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरतो. रात्रीच्या वेळी चालणेही कठीण होते. पथदिव्यांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पथदिव्यांची व्यवस्था महत्त्वाची आहे.

- सरला तिवारी

बांधकामाचे साहित्य हटवावे

अनेक नागरिकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले आहे. त्यामुळे रहदारीस कमी रस्ता उरतो. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

- माला लांडगे

नियमित फवारणी करावी

गडरलाईनच्या दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा.

- मंदा खंगार.

पावसाळ्यात पाणी साचते

पावसाळ्यात वस्तीत पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास होतो. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे.

- अश्विन चंदनबटवे.

............

Web Title: Nehru Nagar residents suffer from the stench of Gadarline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.