संघाच्या लोकप्रियतेचा नेहरूंनी घेतला होता धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 09:29 PM2018-02-12T21:29:24+5:302018-02-12T21:33:13+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी धसका घेतला होता. यातूनच त्यांनी संघावर बंदी घातली होती. नेहरूंना संघाला संपवायचे होते. मात्र गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनात संघाची आणखी वाढ झाली, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी धसका घेतला होता. यातूनच त्यांनी संघावर बंदी घातली होती. नेहरूंना संघाला संपवायचे होते. मात्र गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनात संघाची आणखी वाढ झाली, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पश्चिम नागपूर नवयुवक मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
खामला प्लॉट होल्डर्स कोआॅपरेटिव्ह सोसायटीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आ.अनिल सोले, सोमलवाडा भाग संघचालक सुधीर वऱ्हाडपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. गोळवलकर गुरुजी हे दूरदृष्टीचे होते. चीनपासून सावध राहण्याचा इशारा गोळवलकर गुरुजींनी फार अगोदरच दिला होता. देशाला विश्वशक्ती करण्यासाठी अण्वस्त्रसंपन्न होण्याचा विचारदेखील त्यांनीच मांडला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संघाचा विस्तार केला. मुळात गोळवलकर गुरुजी हे केवळ एक व्यक्ती या चौकटीपुरते नव्हते. ते एक वैश्विक विचार होते. त्यांच्या मार्गदर्शनातच संघाच्या मुशीतून अनेक विचारवंत निर्माण झाले. डॉ.हेडगेवार व गोळवलकर गुरुजी हे प्रत्येक हिंदूसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत, असे मत पात्रा यांनी व्यक्त केले. नंदू सहस्रबुद्धे यांनी संचालन केले तर प्रा.प्रमोद फटिंग यांनी आभार मानले.