राष्ट्रीय कन्या दिवशीच बेवारस आढळली नवजात चिमुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:32 PM2018-01-24T23:32:44+5:302018-01-24T23:34:28+5:30
देशात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी फिर्यादी प्रफुल बबनराव बुटे (२७) रा. हुडकेश्वर यांच्या तक्रारीवरून नवजात बालिकेला सोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, प्रफुल यांच्या बहिणीचे गणेशपेठ परिसरातील सेठ मथुरादास राठी हिंदी भाषी संघ हायस्कूलजवळ घर आहे. बुधवारी ते सकाळी ९.३० च्या दरम्यान मोठ्या बहिणीकडे जात होते. दरम्यान, त्यांना सेठ मथुरादास राठी शाळेच्या आवारात एका नवजात बाळाच्या किंचाळण्याचा आवाज आला. प्रफुल यांनी जाऊन पाहिले असता त्यांना नवजात बाळ दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बालिकेला तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले. अनैतिक संबंधातून गर्भधारणा किंवा मुलगी नकोशी असल्याने तिला सोडून मातेने पळ काढल्याची चर्चा परिसरात आहे. पोलीससुद्धा या दिशेने तपास करीत आहेत. सध्या चिमुकलीवर मेयो शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.